Sharad Pawar on Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक लढवणार का?; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं | पुढारी

Sharad Pawar on Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक लढवणार का?; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

पुढारी ऑनलाईन : पुण्यातून असो अथवा माढ्यातून मी आता कधीच लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले. ते आज शुक्रवारी बारामतीत बोलत होते. लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी पुणे, माढा आणि सातारा या लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे; पण आतापर्यंत मी १४ निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या आहेत. आता निवडणूक लढणार नाही, असा पुनरुच्चार खुद्द शरद पवार यांनी नुकताच पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला होता. आज पुन्हा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगून चर्चेला पूर्णविराम दिला. (Sharad Pawar on Lok Sabha Election 2024)

सध्या लोकसभेची निवडणुकीसाठी पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांचा शोध घेत आहेत. भाजपने पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्याने ते नेत्यांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला लागले आहेत. तर दुसरीकडे मोहोळ यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. आघाडीत पुणे मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने आमदार व माजी आमदारांसह पदाधिकार्‍यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. असे असताना शरद पवार यांनी पुणे, माढा व सातार्‍यातून मी निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे सांगत सर्वांनाच धक्का दिला.

शरद पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात २०१९ साली अनेक नाट्यमय घडामोडी घडून भाजपचे कमळ फुलले होते. फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर ८४ हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतून भाजपने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिली आहे. फलटणचे रामराजे नाईक-निंबाळकर, अकलूजचे विजयसिंह मोहिते-पाटील या मातब्बरांसह आणखी काहीजणांचा विरोध असूनही रणजितसिंह यांनाच उमेदवारी देण्यात आल्याने माढ्याची लढत अटीतटीची होणार आहे. महाविकास आघाडीतून रणजितसिंहांविरुद्ध कोण असणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी माढा लोकसभा निवडणुकीत बंडखोरी उफाळण्याची चिन्हे अधिक आहेत. (Sharad Pawar on Lok Sabha Election 2024)

Back to top button