ST Bus | अकराशे चालकांची भरती करणार : प्रमोद नेहूल यांची माहिती | पुढारी

ST Bus | अकराशे चालकांची भरती करणार : प्रमोद नेहूल यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांना वेळेत गाड्या उपलब्ध होऊन, सेवेत वाढ करणे आणि जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरविण्याकरिता आम्ही ताफ्यात 1146 चालकांची भरती करत आहोत. यामुळे आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने प्रवासी सेवा पुरवण्यास मदत होणार आहे, असे एसटीचे नवे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दैनिक ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या पुणे विभागाचे मुख्य असलेले विभाग नियंत्रक पद रिक्त होते. आता एसटीच्या मुख्यालयाकडून या पदावर नुकतीच प्रमोद नेहूल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेहूल यांनी नुकताच या ठिकाणी पदभार स्वीकारला. पदभार स्विकारल्यानंतर बुधवारी (दि.20) दै. ‘पुढारी’च्या वतीने नेहूल यांच्याशी संवाद साधून, त्यांची पुढील कामकाजाची भूमिका जाणून घेण्यात आली. या वेळी त्यांनी प्रवासी पूरक कारभार चालवून पुण्यासह परिसरात जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सेवा पुरवणार असल्याचे सांगितले.

योजनांची कडक अंमलबजावणी

यापूर्वी जालनामध्ये विभाग नियंत्रक पदी काम केले आहे. त्यानंतर आता पुण्यात आल्यावर त्यांनी पुण्यातील कारभाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. माहिती घेतल्यानंतर ते प्रवाशांसाठी उपयुक्त असलेल्या योजनांची कडक आणि सक्तीने अंमलबजावणी करण्यावर भर देणार असल्याचे नेहूल यांनी यावेळी सांगितले.

सुस्थितीतील एसटी गाड्या मार्गावर आणणार

एसटीच्या ताफ्यात आता नव्या, अत्याधुनिक अशा गाड्या मार्गावर येत आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे जुन्या आयुर्मान संपलेल्या बस गाड्या ताफ्यातून काढून नव्या आणि सुस्थितीतील गाड्या रस्त्यावर उतरवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही नेहूल यांनी सांगितले.

हेही वाचाॉ

Back to top button