Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील गाव तलावांचे सौंदर्य खुलणार | पुढारी

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील गाव तलावांचे सौंदर्य खुलणार

आशिष शिंदे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील केंबळी (ता. कागल), वाघापूर (ता. भुदरगड), मांगोली (ता. राधानगरी), शेळेवाडी (ता. राधानगरी) या गावांतील तलावांचे संवर्धन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी 12 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या चार तलावांच्या पाण्याची गुणवत्ता जैविक प्रक्रियेद्वारे सुधारण्यात येणार आहे. यामुळे या गाव तलावांचे सौंदर्य आणखी खुलणार असून, प्रदूषण मुक्तीची चळवळ गावागावांत पोहोचवण्यात येणार आहे. (Kolhapur)

त्या – त्या गावातील तलावांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारकडून तलाव संवर्धन योजना राज्यपातळीवर राबवण्यात येत आहे. या योजनेखाली कोल्हापूर जिल्ह्यातील या चार तलावांच्या संवर्धनासाठी निवड करण्यात आली आहे. मौजे वाघापूर, मांगोली, शेळेवाडी, केंबळी या तलावांतील गाळ काढण्यात येणार आहे. या तलावांच्या संवर्धनासाठी एकूण मंजूर निधीपैकी 5 कोटी 85 लाख रुपयांचा निधी पहिल्या हप्त्यात देण्याचा निर्णय घेतला आहे.

तलावांभोवती हरित पट्टा

शेळेवाडी, मांगोली, वाघापूर, केंबळी येथील तलावांच्या किनार्‍यावर स्थानिक झाडांची लागवड करून हरित पट्टा विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. हरित पट्टा विकसित करताना स्थानिक झाडांच्या लागवडीसह, बांबू, वाळा, कर्दळी, शेवगा यांसारख्या वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. यामुळे जमिनीची धूप रोखण्यास मदत होईल व नैसर्गिकरीत्या जलशुद्धीकरण देखील होईल.

‘ही’ कामे होणार

* तलावात साचलेला
* गाळ काढला जाणार
* तलावाचे प्रदूषण रोखणार
* तलावातील अनावश्यक वनस्पती नष्ट करून त्यांची वाढ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना
* जैविक प्रक्रियेद्वारे तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यात येणार
* तलावाचा किनारा सौंदर्यीकरण करून हरित पट्टा विकसित करण्यात येणार
* तलावाभोवती कुंपण परिसरात बालोद्यान
* स्वच्छतागृहे उभारण्यात येणार

गाव तलावांच्या संवर्धनासाठी मंजूर निधी

गाव तलाव          एकूण मंजूर निधी                   पहिल्या टप्प्यातील निधी
मौजे वाघापूर     3 कोटी 32 लाख 79 हजार         1 कोटी 50 लाख
मौजे शेळेवाडी   2 कोटी 99 लाख 30 हजार         1 कोटी 50 लाख
मौजे केंबळी      2 कोटी 47 लाख 50 हजार         1 कोटी 50 लाख
मौजे मांगोली     3 कोटी 4 लाख 5 हजार             1 कोटी 50 लाख

Back to top button