रोज नऊ हजार पावले चालणेही ठरते प्रभावी; हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका हाेताे कमी | पुढारी

रोज नऊ हजार पावले चालणेही ठरते प्रभावी; हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका हाेताे कमी

लंडन : चालण्यासारखा दुसरा चांगला व्यायाम नाही. आपल्याकडे वेदांमध्ये ‘चरैवेति चरैवेति’ म्हणजेच ‘चालत राहा, चालत राहा’ असे सांगणारी एक कथा आहे. त्याचा आरोग्याच्या द़ृष्टीनेही मतितार्थ घेता येऊ शकतो. व्यग्र जीवनात चालण्याचे महत्त्व लोकांना कळू लागले आहे. अनेकांनी स्वतःसाठी एका दिवसात 10 हजार पावले चालण्याचे टार्गेट ठेवले आहे. दिवसातून किमान 2200 पावले चालली पाहिजेत, असे सांगण्यात येते. परंतु नुकत्याच आलेल्या ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्टस् मेडिसिनच्या अहवालात असे म्हटले आहे की, दररोज 2200 पावले देखील हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका कमी करतात. मात्र 9 हजार पावले अधिक प्रभावी ठरल्याचेही सांगण्यात आले.

अर्थात एवढे चालल्यानंतरही आजारांचा धोका कमी होतो का? तर उत्तर नाही असे आहे. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक कीथ बार म्हणतात, सुरुवातीला आपण किती चाललो हे मोजणे अनेकदा उपयुक्त ठरते. पण तुम्ही सातत्याने दररोज सुमारे 6 हजार किंवा 8 हजार पावले चाललात की, चालण्याच्या गतीकडे अधिक लक्ष देणे सुरू करा. चालण्यामुळे स्नायू आकुंचन पावतात. यामुळे पायातून रक्त हृदयापर्यंत पोहोचते. यामुळे हृदयावर ताण पडतो.

यामुळे कालांतराने तुमचे हृदय अधिक मजबूत आणि कार्यक्षम बनते. जोरात चालणे म्हणजे जास्त कॅलरीज कमी करणे असा होत नाही, त्यामुळे हृदयाला बळ मिळते. अनेकांना प्रश्न पडतो की, घराच्या आत चालायचे की बाहेर? यावर बार म्हणतात, जेव्हा तुम्ही घराबाहेर फिरता तेव्हा तुम्ही निसर्गाच्या अधिक जवळ असता. त्यामुळे चालण्यासोबतच ताणही कमी होतो. शक्य असल्यास बाहेर फिरणे फायदेशीर ठरते. वेगाने चालणे हे अधिक लाभदायक ठरत असते.

Back to top button