Vasant More Resignation : मी माझ्या हाताने परतीचे दोर कापले: मनसेच्या राजीनाम्यानंतर वसंत मोरे भावूक | पुढारी

Vasant More Resignation : मी माझ्या हाताने परतीचे दोर कापले: मनसेच्या राजीनाम्यानंतर वसंत मोरे भावूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे शहरात जे लोक पक्ष वाढीसाठी काम करत नाही, अशा लोकांसोबत काम करता येणार नाही, म्हणून मी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.अद्याप कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, मनसेमध्ये परत जाण्याचे दोर मी माझ्या हाताने कापले आहेत. पुढील दोन दिवसांत पुढील दिशा ठरवणार असून आता पुण्यातील जनता माझी दिशा ठरवतील, अशा शब्दांत मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मोरे भावूक झाले. Vasant More Resignation

वसंत मोरे पुढे म्हणाले की, पुणे लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छुक होतो. परंतु, मला तिकीट मिळू नये म्हणून पक्षातील काही लोकांचे प्रयत्न सुरू होते. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वेळ मागितली, परंतु वेळ मिळाली नाही. माझ्यावर वेळोवेळी अन्याय झाला. चुकीच्या गोष्टी राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोवल्या. निवडणूक लढविणे हा माझा गुन्हा आहे का ? पुण्यातून मनसेचा पहिला खासदार मी झालो असतो. माझी त़डफड नेत्यांना का दिसत नाही. राजीनामा दिल्यावर फोन आले, त्याआधी फोन का आले नाही? असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला. Vasant More Resignation

चुकीच्या लोकांच्या हातात शहराची जबाबदारी दिली आहे. अशा लोकांबरोबर काम करणे अवघड झाले होते. स्थानिक पातळीवरील राजकारणाला कंटाळून मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

Vasant More Resignation : वसंत मोरे यांचे राज ठाकरेंना पत्र

वसंत मोरे यांनी पत्रात म्हटले आहे की, पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु, अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत, यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो, त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ‘कोंडी’ करण्याचे ‘तंत्र’ अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे

हेही वाचा 

Back to top button