मनसेचे वसंत मोरे यांनी घेतली शरद पवारांची भेट : राजकीय चर्चेला उधाण | पुढारी

मनसेचे वसंत मोरे यांनी घेतली शरद पवारांची भेट : राजकीय चर्चेला उधाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. मार्केटयार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभा मतदारसंघ निहाय बैठक सुरू आहे. त्या दरम्यान मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

निसर्ग मंगल कार्यालयात सकाळी दहापासून बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. दुपारी दोनपर्यंत मुळशी, पुरंदर आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा शरद पवार यांनी आढावा घेतला. दरम्यान मुळशी मतदार संघाचा आढावा सुरू असताना मनसेचे वसंत मोरे अचानक निसर्ग मंगल कार्यालयात उपस्थित राहिले. त्यांच्या येण्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भुवया उंचावल्या. तर काही काही कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला पुढे सरसावले आणि तुतारी वाजवत स्वागत केले. दरम्यान, मोरे यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली.

त्यांची भेट घेऊन आल्यानंतर मोरे म्हणाले, कात्रज दूध डेअरी जवळी नऊ एकर जागेवर महापालिकेमार्फत आरक्षण टाकण्यात आले आहे. ते आरक्षण उठविण्यासाठी महापालिका आयुक्त यांची वारंवार भेट घेतली, मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची दीड महिन्यापासून भेट घेण्याचा प्रयत्न करत होतो. सुळे यांनी आज मला बोलवलं होतं, पण इथे आल्यानंतर कळलं की पवार साहेब इथं असल्याचे कळाले. सुप्रिया सुळे यांना भेटल्यानंतर त्यांनी साहेबांची भेट करून दिली.

हेही वाचा

Back to top button