Rishabh Pant | ब्रेकिंग! ऋषभ पंत IPL 2024 मध्ये खेळणार; BCCI ची माहिती | पुढारी

Rishabh Pant | ब्रेकिंग! ऋषभ पंत IPL 2024 मध्ये खेळणार; BCCI ची माहिती

पुढारी ऑनलाईन ; तडाखेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. ऋषभ पंत याला आता आगामी IPL साठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून फीट घोषित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने X वर पोस्ट करत दिली आहे. ऋषभ पंतला ३० डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या जीवघेण्या रस्ते अपघातानंतर १४ महिन्यांच्या पुनर्वसन आणि रिकव्हरी प्रक्रियेतून जावे लागले. आता तो आगामी IPL साठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून फीट असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

दरम्यान, बीसीसीआयने मात्र पुष्टी केली आहे की, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा या हंगामात टी-२० लीगमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत.

प्रसिद्ध कृष्णा

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. त्याच्यावर वर २३ फेब्रुवारी २०२४ रोजी शस्त्रक्रिया झाली. सध्या त्याच्यावर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवले जात आहे आणि लवकरच तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रुजू होईल. पण आगामी TATA IPL 2024 मध्ये तो भाग घेऊ शकणार नाही.

मोहम्मद शमी

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला उजव्या टाचेचा त्रास जाणवत होता. या समस्येवर २६ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. सध्या त्याच्याकडे BCCI चे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे आणि आगामी TATA IPL 2024 मधून तो बाहेर राहील, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या फिटनेसबाबत नुकतेच अपडेट दिले होते. पाँटिंगने म्हटले होते की, २६ वर्षीय ऋषभ पंतने बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) यष्टीरक्षक म्हणून सराव सुरू केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, तो नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पंत अनेक अडचणींवर मात करत सध्या तो इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीपूर्वी काही गती मिळविण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेत आहे.

दरम्यान, एनसीएने आधीच पंतला (Rishabh Pant) मॅचसाठी फिट प्रमाणपत्र दिले आहे. याचाच अर्थ की पंत आयपीएलमधील सर्व सामने खेळू शकतो. डिसेंबर २०२२ मध्ये भीषण कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. आता यातून त्याने बरा होऊन सराव सुरु केला आहे. पाँटिंगने नमूद केले की पंत चांगल्या फिटनेससाठी प्रशिक्षण घेत आहे आणि त्याच्या प्रगतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button