IPL 2024 : ‘आयपीएल’वर पाणी संकट? | पुढारी

IPL 2024 : ‘आयपीएल’वर पाणी संकट?

बंगळूर, वृत्तसंस्था : बंगळुरात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे होम टाऊन बंगळूर सध्या पाणी संकटातून जात आहे. ‘आरसीबी’चे होम ग्राऊंड चिन्नास्वामी स्टेडियम हिरवे गार ठेवणे आणि खेळपट्टी खेळण्यायोग्य ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागणार आहे. याचा परिणाम हा आगामी ‘आयपीएल’च्या (IPL 2024) सामन्यांवर होण्याची दाट शक्यता आहे. ‘आरसीबी’ त्याचे सामने होम ग्राऊंड बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे. 25 मार्चला आरसीबी-पंजाब किंग्जसोबत खेळणार आहे.

दरम्यान, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने (केएससीए) पाणी संकटावर चर्चा करून उपाय शोधण्यासाठी बैठक बोलावली आहे. त्यामुळे ‘केएससीए’ आयपीएल सामन्यांसाठीच्या खेळपट्ट्यांना कसे पाणी पुरवणार हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

कर्नाटकची राजधानी बंगळूरवरील पाणी संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. त्यातच चिन्नास्वामी स्टेडियमवर ‘आयपीएल’चे सामने आयोजित करायचे आहेत. इतके दिवस खेळपट्टी खेळण्यायोग्य ठेवण्यासाठी तिला मोठ्या प्रमाणावर पाणी देण्याची गरज आहे. तसेच आऊट फिल्डदेखील हिरवी गार ठेवण्यासाठी मुबलक पाणी लागणार आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये मार्चमध्येच पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. (IPL 2024)

संबंधित बातम्या

शहरातील टँकरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या आठवड्यात यात जास्तच वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जो पाण्याचा टँकर 700 ते 800 रुपयाला मिळत होता तो आता 1,500 ते 1,800 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ही परिस्थिती बंगळूर पाणीपुरवठा विभागाने पुढचे पाच महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगूनही उद्भवली आहे.

सध्या ‘आयपीएल 2024’च्या सुरुवातीचेच वेळापत्रक जाहीर झाले आहे. अजून दुसरे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर ‘बीसीसीआय’ आयपीएलचे उर्वरित शेड्युल जाहीर करणार आहे.

Back to top button