राजधानीत महिला दिनानिमित्त तीन तेजस्विनींच्या मुलाखती, ‘पुढचे पाऊल’ संस्थेचे आयोजन | पुढारी

राजधानीत महिला दिनानिमित्त तीन तेजस्विनींच्या मुलाखती, 'पुढचे पाऊल' संस्थेचे आयोजन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राजधानीत “पुढचे पाऊल” संस्थेच्या वतीने महिला दिन विशेष कार्यक्रम पार पडला. वेगवेगळ्या क्षेत्रातील तीन महिलांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. वेगवेगळ्या क्षेत्रातील तीन  महिलांची प्रकट मुलाखत यानिमित्ताने घेण्यात आली. यामध्ये केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या सचिव सुजाता चतुर्वेदी, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या माजी सदस्या ज्योतिका कालरा, लेखिका आणि जनसंपर्क तज्ज्ञ अर्चना मिरजकर यांची मुलाखत झाली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
राजधानीत पार पडलेल्या या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या सचिव सुजाता चतुर्वेदी, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या माजी सदस्या ज्योतिका कालरा, लेखिका आणि जनसंपर्क तज्ज्ञ अर्चना मिरजकर यांना सुप्रिया देवस्थळी, अनुजा बापट आणि राजश्री पाटील यांनी बोलते केले. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि विविध गोष्टी यावर या निमित्ताने त्यांनी प्रकाश टाकला. दिल्लीस्थित अनेक मराठी मंडळी मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमाला उपस्थित होती.
कार्यक्रमाची सुरुवात दिल्लीतील नूतन मराठी विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. प्रास्ताविकातुन ‘पुढचे पाऊल’ संस्थेबाबत आणि संस्थेच्या उपक्रमाबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुशील गायकवाड ह्यांनी दिली. कार्यक्रमाध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यांनी यावेळी बोलताना ‘पुढचे पाऊल’ सुरु करण्यामागचा विचार आणि महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाच्या महत्वावर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी भाजीभाकरे यांनी केले. कार्यक्रमाला पुढचे पाऊल संस्थेच्या सचिव रेखा रायकर, उपाध्यक्ष सुगंध कुमार चौगुले, संतोष चाळके उपस्थित होते.
वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना जीवाला धोका निर्माण होतो. पण ते अनुभव समृद्ध करणारे असतात. महिला म्हणून काही वेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागला का, या प्रश्नाचे सरसकटीकरण झालेले आहे. महिला – पुरुष असा भेदभाव न करता काम केले पाहिजे. क्रीडा क्षेत्रातही महिला विशेष कामगिरी करत आहेत. आपण जे काम करतो तो एकप्रकारे यज्ञच आहे.
-सुजाता चतुर्वेदी, सचिव, क्रीडा विभाग

हिडिंबा, चित्रलेखा , कुंती, उलुपी, रुख्मिणी या पाचही पौराणिक व्यक्तिरेखा कायम दुर्लक्षिल्या गेल्या आहेत. स्वतःच्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावरचे निर्णय त्यांनी स्वतः घेतले. त्यामुळे महाभारताला वेगळे वळण मिळाले. या एकप्रकारे बंडखोर व्यक्तिरेखा आहेत. त्यांच्याविषयी लिहिताना मला हे जाणवले आणि लेखिका म्हणून चौकटीबाहेर विचार करण्याची सवय लागली.
– अर्चना मिरजकर, लेखिका आणि जनसंपर्क तज्ञ

संघर्ष म्हणजे एकप्रकारे आपला स्वतःचा होत जाणारा विकास असतो. लोकांना भेटणे, नेटवर्किंग याकडे कोणी नकारात्मकतेने बघतात. मात्र जास्तीत जास्त लोकांना भेटले पाहिजे. कौटुंबिक जीवनात सुखी असलेच पाहिजे. पण फक्त त्यालाच आपण सर्वस्वी यश समजता कामा नये, अस मला वाटते.
– ज्योतिका कालरा, सदस्या, राष्ट्रीय महिला आयोग

Back to top button