तडका : राजकीय डील | पुढारी

तडका : राजकीय डील

सध्या राज्यात सुरू असलेले राजकारण सर्वसामान्य मतदारांच्या डोक्याचा भुगा केल्याशिवाय राहणार नाही. केवळ लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या स्वतंत्र निवडणुका असत्या तर गोष्ट वेगळी होती. या वेळेला आधी लोकसभेच्या निवडणुका होतील आणि त्यापाठोपाठ काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मागील वेळी परस्परांच्या विरोधात लढलेले पक्ष या निवडणुकांमध्ये एकत्र मिळून लढत आहेत आणि त्यामुळेच राज्यातील जनतेच्या मनोरंजनाला काहीही सीमा राहिलेली नाही.

आता लोकसभेला तुमचे काम करायचे असेल तर येत्या विधानसभेमध्ये तुम्हाला आमचे काम करावे लागेल, ही एक प्रकारची डील सर्वत्र सुरू आहे. शिवाय मागच्या वेळी कोणी कोणाला धोका दिला, हे लक्षात ठेवूनच यावर्षी करारनामे होत आहेत. साधारणत: एका लोकसभा मतदारसंघांमध्ये पाच-सहा किंवा सात विधानसभा मतदारसंघ असतात. विधानसभेच्या आमदाराचा आपल्या मतदारसंघावर बर्‍यापैकी प्रभाव असतो. त्यामुळे त्या आमदाराने लोकसभेला आपल्यासाठी काम करावे ही लोकसभेसाठी निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांची आणि त्यांच्या पक्षाची इच्छा असते. लोकसभेला तुमचे काम करतो; पण विधानसभेला मला साथ द्या, अशी मागणी विद्यमान आमदार होऊ घातलेल्या खासदारांकडे करत आहेत. विधानसभेत निवडून येताना खासदाराची मदत होऊ शकते, हे विधानसभेच्या उमेदवाराला माहीत असते. अशात बातम्यांचा आढावा घेतला तर मागील वेळी काय घडले, विधानसभेत काय घडले आणि लोकसभा निवडणुकांमध्ये काय घडले, याची चर्चा होताना दिसते.

एखाद्या आमदाराचे काम प्रभावी असेल आणि पक्षाला वाटले तर त्याला लोकसभेला उभे करून देशाची सेवा करण्याची संधी दिली जात आहे. बरेच आमदार अशाप्रकारे लोकसभेच्या निवडणुका लढवायला तयार नसतात, कारण आमदारकीचे अजून सहा ते आठ महिने शिल्लक आहेत. या काळात जी काय आपल्या मतदारसंघाची सेवा (?) करता येईल ती करण्याची संधी का दवडायची, असा त्यांचा प्रश्न असतो. आमदाराला जेवढे ग्लॅमर आहे, तेवढे खासदाराला नसते. आमदार म्हणजे आपल्या स्थानिक प्रश्नांची तत्काळ सोडवणूक करू शकणारी पॉवरफूल व्यक्ती म्हणून जनता त्याला ओळखत असते.

पोलिस ठाण्यामध्ये जमानत करायची असो की भाडेकरू आणि घरमालक यांचा वाद असो, हे सर्व वाद आपल्या स्वतःच्या ताकदीवर मिटवण्याची आमदाराची क्षमता असते. त्यामुळे सततचा जनसंपर्क, मुंबईचे दौरे, विधानसभेत विचारले जाणारे प्रश्न, कर्मचार्‍यांच्या बदल्या या सगळ्यामुळे आमदारांच्या विहिरीला भरपूर झरे असतात आणि त्या पाण्यामध्ये आमदार ओलेचिंब होत असतात. सध्या आमदार असलेल्या राजकीय व्यक्तींना साहजिकच आपल्या भविष्याची चिंता असते. यामुळेच लोकसभेच्या निवडणुकांसाठी एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी आमदार डील करत असतात.

Back to top button