लातूर: वाघनाळवाडीत सप्ताहाच्या पंगतीला भगरीचा प्रसाद: २०० भाविकांना विषबाधा | पुढारी

लातूर: वाघनाळवाडीत सप्ताहाच्या पंगतीला भगरीचा प्रसाद: २०० भाविकांना विषबाधा

देवणी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जवळगा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वाघनाळवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त भगरीच्या प्रसादातून दोनशेहून अधिक भक्तांना विषबाधा झाल्याची घटना गुरूवारी (दि.७) रात्री एकच्या सुमारास घडली. यापैकी १५०  गावकऱ्यांवर गावातील एका मंदिरात तर उर्वरित ५० जणांना वलांडी येथील आरोग्य केंद्रात व साकोळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देवणी तालुक्यातील वाघनाळवाडी या गावात ही घटना घडली. अखंड हरिनाम सप्ताहात गुरूवारी एकादशी असल्याने सायंकाळी पाचच्या सुमारास फराळ करण्यात आला होता. या भगरीतून गावकऱ्यांना विषबाधा झाली. रात्री बारानंतर गावातील लोकांना अचानक उलट्या होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काही जणांना उलट्या,चक्कर, अशक्तपणा होण्याचे प्रमाण वाढल्याने याच लक्षणाची रुग्ण संख्या देखील झपाट्याने वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले.

याची माहिती ग्रामपंचायत सदस्य रवि चिलमिले यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला घटनेची कल्पना देत तातडीने घटनास्थळी धाव सदर ठिकाणी वलांडी येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एस. काळे यांच्या आरोग्य पथकाने वाघनाळवाडी गावात वैद्यकीय यंत्रणा कार्यान्वित केली व स्वतः गावास संपूर्ण बाधित रूग्णांची तपासणी होईपर्यंत उपस्थित होते. ज्या गावकऱ्यांना जास्त प्रमाणात उलट्या होत्या. त्या सर्व ग्रामस्थांना तातडीने वलांडी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उर्वरित ग्रामस्थांना गावातील मंदिर सभागृहात उपचार सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आरोग्य विभागाचे पथक गावात ठाण मांडून होते. सर्व परिस्थितीवर आरोग्य विभाग लक्ष देऊन रूग्णांच्या तब्येतीची काळजी घेत नियंत्रणात आहे.

हेही वाचा 

Back to top button