बंगालमध्ये भाजप प्रवेश केलेले न्यायमूर्ती कधीपासून भाजपच्या संपर्कात होते याची चौकशी व्हावी : उद्धव ठाकरे | पुढारी

बंगालमध्ये भाजप प्रवेश केलेले न्यायमूर्ती कधीपासून भाजपच्या संपर्कात होते याची चौकशी व्हावी : उद्धव ठाकरे

तुळजापूर ; पुढारी वृत्तसेवा बंगालमध्ये न्यायमूर्तींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. ते न्यायमूर्ती किती दिवसांपासून भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात होते आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोणकोणते निर्णय दिलेले आहेत याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुळजापुरात केली.

तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने कुटुंब संवाद जाहीर सभा संपन्न झाली. या सभेमध्ये शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा समाचार घेतला. तुळजापूर येथे तुळजाभवानीचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी भवानी मातेची आरती केली. या दरम्यान त्यांचा तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने तहसीलदार सोमनाथ माळी यांनी तुळजाभवानीची प्रतिमा देऊन कार्यालयात सत्कार केला.

बस स्थानक परिसरात झालेल्या जाहीर सभेमध्ये शिवसेना पक्षनेत्या सुषमा अंधारे, खासदार संजय राऊत, मिलींद नार्वेकर, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा महिला प्रमुख सौ शामल वडणे, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी यांच्यासह इतर शिवसेना नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीने अत्यंत चुकीच्या पद्धतीने देशामध्ये राजकारण सुरू केलेले आहे. वेगवेगळे पक्ष फोडून भारतीय जनता पार्टीने राजकारणाची दशा आणि दिशा बदलून टाकली आहे. वैचारिक राजकारण देखील संपवून टाकले आहे. केवळ उद्योगपतींना सांभाळणारे आणि मुठभर लोकांच्या हितासाठी गोरगरीब जनतेवर अन्याय करणारे शासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून चालवले जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा धार्मिक कारणावरून सहा वर्ष मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता आणि आता मात्र प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री राजकारणामध्ये धर्माचा वापर करीत आहेत हा विरोधाभास जनतेने ओळखला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बळ दे अशा शब्दात तुळजाभवानी देवीला माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी साकडे घातले.

निश्चितपणे सुप्रीम कोर्टापासून आम्हाला न्याय मिळेल आणि शिवसेना आमची आहे हे कोर्ट देखील सांगणार आहे, परंतु त्याला आणखीन थोडा वेळ आहे. भविष्यामध्ये शिवसेना पक्ष कोणाचा आहे त्यांना निश्चित कळेल असा इशारा देऊन निवडणूक आयोग पक्षाचे चिन्ह बदलू शकते, परंतु पक्षाचे नाव आणि पक्षाची स्थापना करणाऱ्या व्यक्ती विरोधात निर्णय देऊ शकत नाही असे देखील याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आपण जेव्हा वर्षा बंगला सोडला आणि मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला तेव्हा महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांमध्ये उभे राहिलेले अश्रू आजही माझ्या लक्षात आहेत. आपण देखील तो क्षण आणि तो प्रसंग आगामी काळापर्यंत विसरला नाही पाहिजे, शिवसेना हा पक्ष वडिलोपार्जित आमचा आहे आणि अशा प्रकारची घराणेशाही आम्हाला मान्य आहे. ठाकरेंच्या अनेक पिढ्या शिवसेना वाढवण्यासाठी खर्ची पडल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या डोळ्यांमध्ये उभे राहिलेले पाणी हेच माझे वैभव आहे. माझी ताकद आहे अशा शब्दात मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्‍यानंतरच्या प्रसंगाची उद्धव ठाकरे यांनी आठवण करून दिली.

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर होणारा अन्याय अत्यंत क्रूर आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न न सोडवता गोळीबार करणे आणि रस्त्यावर खिळे ठोकणे अशी प्रवृत्ती हिंसक वृत्तीची आहे. त्यामुळे हा अन्याय आणि हुकूमशाही संपविण्यासाठी देशभर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात खूप मोठे रान उभे राहिले आहे. मणिपूर मध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी भेट दिली नाही हा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला.

जेव्हा नरेंद्र मोदी केंद्रीय राजकारणामध्ये नव्हते तेव्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये कल्पना नरहिरे आणि शिवाजी कांबळे यांच्यासारखे खासदार या जिल्ह्यामध्ये निवडून आलेले आहेत. त्यामुळे आम्ही मोदींचे फोटो लावून निवडून आलो हा मुद्दा महत्त्वाचा ठरत नाही. हिंदुत्वासाठी आम्ही युती केली होती, परंतु हा निर्णय चुकीचा होता. 2014 आणि 2019 या वर्षे चुकीची ठरली अशा शब्दात मनातील आपल्या भावना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. मी उद्योगपती धार्जिने असणाऱ्या भाजपच्या राजकारणाला बळी पडलो नाही म्हणून त्यांनी सरकार पाडले हे लोक केवळ महाराष्ट्र लुटण्यासाठी राजकारण करीत आहेत. आपण त्यांना महाराष्ट्र लुटू दिला नाही असे देखील या प्रसंगी त्यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कायम शिवसेनेचे लाट राहिलेली आहे. कोणत्याही निवडणुकीमध्ये शिवसेनेने या भागात सदैव यश प्राप्त केले आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे मतदारांच्या गळ्यातील ताईत असल्यामुळे लोकप्रिय आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उपस्थित लोकांकडून विजय साजरा होत असेल तर विरोधकांनी समजून घ्यावे असा टोला देखील या प्रसंगी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सभेत लगावला.

सभा पार पडल्यानंतर रात्री दहा वाजता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यानंतर देवीची आरती केली. या प्रसंगी शिवसेनेचे इतर नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button