जळगाव : झोनल ट्रेनिंग शाळेत प्राचार्यसह कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक; सीबीआयची कारवाई | पुढारी

जळगाव : झोनल ट्रेनिंग शाळेत प्राचार्यसह कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक; सीबीआयची कारवाई

जळगांव; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्राचार्यासह लिपिकाला ९ हजाराची लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ अटक केली आहे. पुणे सीबीआयने ही कारवाई केली असून याबाबत अधिक चौकशी सुरु आहे.

रेल्वे प्रशासनाच्या आरपीएफ ठाणे भुसावळ लोको शेड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या झोनल रेल्वे प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी तक्रारदार अक्षय चौधरी यांची कार भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली आहे. या मालकाचा करार संपलेला असल्याने गाडीच्या लॉक बुकवर नोंदी करुन देण्यासाठी प्राचार्य सुरेश चंद्र जैन (IRTS) यांनी पैसे मागितले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार बुधवारी (दि. ६) दुपारी कार मालकाने मुख्याध्यापकांच्या चेंबरमध्ये जाऊन लिपिक योगेश देशमुख यांच्याकडे ९ हजार रूपये दिले. हे पैसे लिपिकाने मुख्याध्यापकांना देताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईचे नेतृत्व सीबीआय पुणेचे निरीक्षक महेश चौहान करत आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून झेडआरटीआयमध्येच सुरू आहे. एफआयआर मिळाल्यानंतर प्रकरणाची प्रगती आणि तपशीलवार अहवाल पाठविला जाईल. असे रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस स्टेशन भुसावळ लोकेशन कडून कळविण्यात आलेले आहेत

Back to top button