विजेचा लपंडाव; पिकांना फटका : अतिरिक्त भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त | पुढारी

विजेचा लपंडाव; पिकांना फटका : अतिरिक्त भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : यंदा मार्च महिन्याच्या प्रारंभीच कमाल तापमान वाढू लागले आहे. कडक उन्हाच्या झळांनी पिकांची अवस्था केविलवाणी होत असताना विजेचा लपंडाव आणि अतिरिक्त भारनियमनाचा फटका या पिकांना बसू लागला आहे. बिबट्याच्या भीतीने रात्री पिकांना पाणी देता येत नाही अन् दिवसा विजेचा लपंडाव आणि अतिरिक्त भारनियमनामुळे पिकांची तहान भागवताना शेतकर्‍यांची पुरती दमछाक होत आहे. त्यामुळे शेती पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे.
बेट भागातील पिंपरखेड, जांबूत येथील वीज उपकेंद्रांना आंबेगाव तालुक्यातील काठापूर येथील वीज केंद्रातून वीजपुरवठा होतो. विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरणकडून अचानक अतिरिक्त भारनियमन केले जात आहे.

रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा जोमात असताना कडक उन्हासह ढगाळ वातावरणामुळे पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पाणी दिल्यानंतरही कडक तापमानात पिके कोमेजून जातात. अशा अवस्थेत शेती पंपांना आठ तासांपैकी सहा तास वीजपुरवठा होतो. त्यात तांत्रिक अडचणी, लंपडावामुळे पिकांची तहान भागविणे अवघड झाले आहे. कांदा पिकाबरोबरच जनावरांची चारापिके, ऊस, मका तसेच मलचिंगचा वापर करून घेतलेल्या तरकारी पिकांची अवस्था केविलवाणी होत आहे.

बळीराजाची अवस्था बिकट

अस्मानी संकटाशी दोनहात करून पिकविलेल्या शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. आता मागणीच्या तुलनेत वीजपुरवठा होत नसल्याने बळीराजाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. अनेकवेळा महावितरणच्या संबंधित अधिकार्‍यांनाही वीजपुरवठा कधी खंडित होणार, याची माहिती नसते. त्यामुळे शेतीच्या कामांचे नियोजन कोलमडल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

शेती पंपांना दिवसा वीज द्या

मार्च महिन्यात शेती पंपांना आठवड्यातील तीन दिवस रात्री वीजपुरवठा सुरू आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. जीव मुठीत धरून शेतकर्‍यांना रात्री घराबाहेर पडावे लागते. बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button