NMC News | मनपाचे ई-चार्जिंग स्टेशन्स मंजुरीच्या टप्प्यात | पुढारी

NMC News | मनपाचे ई-चार्जिंग स्टेशन्स मंजुरीच्या टप्प्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत नाशिक महापालिकेकडून शहरात प्रस्तावित १०६ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सपैकी पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आलेल्या २० चार्जिंग स्टेशन्सची उभारणी मंजुरीच्या टप्प्यात आली आहे. चार्जिंग स्टेशन्सच्या उभारणीसाठी निविदाप्रक्रिया अंतिम करण्यात आली असून, यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या गुरुवारी (दि. ७) होणाऱ्या सभापटलावर मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.

केंद्र सरकारने पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच पारंपरिक इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषण मुक्तीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. इलेक्ट्रिक वाहने चार्जिंगसाठी ई-चार्जिंग स्टेशन्सची आवश्यकता भासेल. त्यासाठी नॅशनल क्लीन एअर पॉलिसी अर्थात एन-कॅपअंतर्गत केंद्राने निधी देऊ केला आहे. ई-चार्जिंग स्टेशन्सकरिता महापालिकेने शहरात १०६ जागा निश्चित केल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २० ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जाणार आहे.

त्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. मुदतीत निना हॅण्ड्स, मरिन इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, टेस्को चार्ज झोन लिमिटेड, मावेन कॉर्पोरेशन, शरिफाय सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, जिवाह इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड तसेच युनिक एंटरप्रायझेस या सात कंपन्यांच्या निविदा सादर झाल्या होत्या. प्राप्त निविदांचे मूल्यमापन करून कमी देकार भरणाऱ्या मक्तेदार संस्थेला काम दिले जाणार आहे. यासाठी ‘एन कॅप’ अंतर्गत १० कोटींचा निधी प्राप्त होणार आहे.

या ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन्स
केंद्र सरकारच्या ‘एन-कॅप’ योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मुख्यालय राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिक रोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडिअम सिडको, बिटको हॉस्पिटल, कृषिनगर जॉगिंग ट्रॅक, बी. डी. भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मानगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर मनपा जागा, अंबड लिंकरोडवरील मनपा मैदान या २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जाणार आहे.

Back to top button