महिलांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा फडणवीसांचा डाव : जरांगे यांचा आरोप | पुढारी

महिलांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा फडणवीसांचा डाव : जरांगे यांचा आरोप

वडगोद्री ः पुढारी वृत्तसेवा : महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचा माझ्यावर हल्ला करण्याचा डाव होता, असा आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे. ते रविवारी माध्यमांशी बोलत होते. आपण राजकारणात येणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या 

काही दिवसांपूर्वी भाजप महिला मोर्चातील कार्यकर्त्यांनी जरांगे यांची भेट घेतली होती. त्यावेळी महिला कार्यकर्त्यांबद्दल समाज माध्यमांवर मराठा समाजाच्या वतीने वापरलेल्या भाषेबाबतची तक्रार या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर या महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फडणवीस यांचा माझ्यावर हल्ला करण्याचा डाव होता, असा आरोप जरांगे यांनी केला आहे.

दरम्यान, ‘माझ्या दारात यायचं नाही’ असे लिहिलेले स्टिकर तयार करण्याचे निर्देश त्यांनी समाज बांधवांना दिले आहेत. हे स्टिकर घर, गाड्यांवर चिकटवण्याची मोहीम सुरू करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. राजकारणात येण्याची शक्यताही त्यांनी फेटाळली आहे. ते म्हणाले, राजकारण हा माझा प्रांत नसल्याचे मी यापूर्वीही स्पष्ट केले आहे. मात्र, लोकशाहीत कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठवाड्याचा दौरा सुरू केला असून उद्या सोमवारी ते नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या निमित्ताने त्या परिसरात बैठकांचे आयोजनही करण्यात आले आहे.

Back to top button