डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ते मारेकऱ्यांना जन्मठेप; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम | पुढारी

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ते मारेकऱ्यांना जन्मठेप; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप असलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली; तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. डॉ. दाभोलकर यांची हत्या ते मारेकऱ्यांना जन्मठेप, जाणून घेऊया संपूर्ण घटनाक्रम…

  • 20 ऑगस्ट 2013 : डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांची महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या.
  • 19 डिसेंबर 2013 : संशयित कुख्यात शस्त्र तस्कर मनीष नागोरी व विकास खंडेलवाल यांना अटक. नागोरीने खंडेलवालला दिलेले पिस्तूल आणि दाभोलकरांच्या शरीरातील गोळी ‘मॅच’ झाल्याचा ‘बॅलेस्टिक एक्सपर्ट’चा अहवाल.
  • 9 मे 2014 : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या गुन्ह्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला.
  • 1 जून 2016 : आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सारंग अकोलकर यांच्या घरावर सीबीआयचे छापे.
  • 10 जून 2016 : पनवेलमधून डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला अटक.
  • 14 जून 2016 : डॉ. तावडे हा गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा सीबीआयचा न्यायालयात दावा.
  • 30 नोव्हेंबर 2016 : वीरेंद्र तावडेविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल.
  • 21 मे 2018 : बंगळूरमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांकडून अमोल काळेला अटक.
  • 10 ऑगस्ट 2018 : नालासोपारा परिसरात शस्त्रसाठा प्रकरणात दहशतवाद प्रतिबंधक विभागाकडून (एटीएस) मुंबईतून वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर यांना अटक.
  • 18 ऑगस्ट 2018 : सचिन अंदुरेला सीबीआयकडून अटक.
  • 31 ऑगस्ट 2018 : अमित दिगवेकर व राजेश बंगेरा यांना सीबीआयकडून अटक.
  • 4 ऑक्टोबर 2018 : डॉ. दाभोलकर यांच्यावर शरद कळसकर यानेच गोळी झाडल्याचा सीबीआयचा दावा.
  • 15 सप्टेंबर 2018 : डॉ. तावडे यांच्यासह पाच जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल.
  • 14 डिसेंबर 2018 : सीबीआयने नव्वद दिवसांत दोषारोपपत्र दाखल न केल्याने अमोल काळे, राजेश बंगेरा, अमित दिगवेकर यांना जामीन.
  • 25 मे 2019 : संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला अटक.
  • 17 डिसेंबर 2019 : अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांचा गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी अर्ज.
  • 5 जुलै 2019 : संजीव पुनाळेकरचा जामीन मंजूर.
  • 30 जानेवारी 2020 : डॉ. तावडे, अ‍ॅड. पुनाळेकर, विक्रम भावे यांच्याविरोधात बेकायदा हालचाली प्रतिबंध कायदा (यूएपीए) लावण्यास राज्य शासनाने परवानगी दिली.
  • 6 मे 2021 : विक्रम भावेचा जामीन मंजूर.
  • 15 सप्टेंबर 2021 : डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्चित.
  • 13 ऑक्टोबर 2021 : 32 साक्षीदारांची यादी सीबीआयच्या वकिलांकडून न्यायालयापुढे सादर.
  • 29 ऑक्टोबर 2021 : पहिल्या साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यास व सुनावणीला सुरुवात.
  • 10 मे 2024 : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी शरद कळसकर व सचिन अंदुरे यांना विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

हेही वाचा : 

Back to top button