Anganewadi Yatra : आजपासून आंगणेवाडीच्या भराडीमातेचा यात्रोत्सव | पुढारी

Anganewadi Yatra : आजपासून आंगणेवाडीच्या भराडीमातेचा यात्रोत्सव

मसुरे; संतोष अपराज : असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडीमातेच्या यात्रोत्सवास (Anganewadi Yatra) शनिवार, दि. 2 मार्चपासून प्रारंभ होत असून यानिमित्ताने आंगणेवाडीत लाखो भाविक-भक्तांचा जनसागरच अवतरणार आहे. मातेच्या दर्शनासाठी भाविक आतूर झाले असून, भाविकांच्या स्वागतासाठी आंगणे कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

राजकीय नेतेमंडळींसह अनेक सेलिब्रिटी या यात्रोत्सवाला येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येपासून भराडी मातेचे मंदिर आणि परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून गेलं आहे. ’माय भवानी तुझे लेकरु… कुशीत तुझिया येई, सेवा मानून घे आई…! अशा आर्त भावनेने भाविक भराडी मातेचे दर्शन घेणार आहेत. (Anganewadi Yatra)

कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या भराडी मातेच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून या उत्सवाला भाविक भक्तगण येणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री विनोद तावडे, खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, माजी खा. निलेश राणे, आ. नितेश राणे यांच्यासह विविध पक्षांचे आमदार, खासदार, माजी महापौर, नगरसेवक यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सेलिब्रिटी या यात्रोत्सवाला येणार आहेत. गेले अनेक दिवस सुरु असलेली तयारी आंगणेवाडी कुटुंबीय, जिल्हा प्रशासन यांनी पूर्ण केली आहे. एकूणच भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यांनी आंगणेवाडी परिसर गजबजुन गेला आहे.

Anganewadi Yatra : ओट्या भरण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन

यात्रोत्सवाच्या निमित्ताने सुवर्ण अलंकाराने भरजरी साडी नेसवून मातेला सजविण्यात आले आहे. आजच्या दिनी मातेचे तेजोमय रुप पाहून मातेचे भक्तगण सुखावणार आहेत. गाभार्‍यामध्ये ओट्या भरण्यासाठी शिस्तबध्द नियोजन आंगणे कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे. सभामंडप व गाभार्‍याचे रंगरुप फुलांच्या सजावटीने अवर्णनिय नयनरम्य असेच भासत असल्याने भक्तांसाठी नंदनवनाची अनुभूती लाभणार आहे.

Anganewadi Yatra : आकर्षक विद्युत रोषणाई

यात्रोत्सवात ओट्या भरण्यास शनिवारी पहाटे 3 वाजल्यापासून प्रारंभ होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिरासह परिसर सजविण्यात आला आहे. मालवण, मसुरे व कणकवली स्टँड नजिक पार्कींग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मंदिर व मंदिर परिसरात 30 ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे लावण्यात आले आहेत. वीज कंपनीने सुध्दा अखंडीत वीज पुरवठ्यासाठी खबरदारी घेतली आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

Anganewadi Yatra : देवीचे दर्शन रांगेतूनच घेण्याचे आवाहन

रात्री 9.30 ते 12 या वेळेत धार्मिक विधीसाठी ओट्या भरण्याचा कार्यक्रम बंद असणार असल्याची माहिती अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली. महनीय व्यक्तीसाठी मुख्य स्वागत कक्षा लगतच खास व्यवस्था करण्यात आली आहे. देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी दहा रांगांमधुन व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भाविकांनी संयम व शिस्त बाळगून देवीचे दर्शन रांगेतूनच घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबियांच्यावतीने भास्कर आंगणे यांनी केले आहे. शनिवारी 2 मार्च रोजी पहाटे यात्रेस सुरुवात होणार असून यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवालय परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून गेला आहे.

Anganewadi Yatra : पोलिसांचा चोख बंदोबस्त

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 20 पेक्षा जास्त अधिकारी, 150 पोलिस, 1 बॉम्ब नाशक पथक, 1 आरसीपी पथक यात्रोत्सवात तैनात असणार आहेत. प्रवेश मार्गावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात असणार असल्याची माहिती मालवण पोलिस निरीक्षकांनी दिली.

यात्रोत्सवासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग व अन्य संबंधित यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. यात्रोकरुंच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने सुमारे 150 जादा गाड्या सोडल्या आहेत. मंदिर आणि परिसरात क्लोज सर्किट कॅमेरांची नजर राहणार आहे. एकूणच यात्रोत्सवासाठी पूर्ण आंगणेवाडी सजली असून लाखो भाविक भक्तांची मांदियाळी अवतरणार आहे. (Anganewadi Yatra)

Back to top button