मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची धावाधाव : हॉस्पिटल, वसतिगृह वेगवेगळ्या ठिकाणी | पुढारी

मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची धावाधाव : हॉस्पिटल, वसतिगृह वेगवेगळ्या ठिकाणी

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : सकाळच्या वेळी कमला नेहरू रुग्णालयात क्लिनिकल पोस्टिंग… दुपारी राजा बहादूर मिल रस्त्यावरील नायडू रुग्णालय परिसरात वर्ग आणि प्रयोगशाळा… वर्ग संपल्यावर सणस मैदानाजवळ वसतिगृह… अशी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची अशा तीन ठिकाणी नुसतीच धावपळ सुरू आहे. नायडू रुग्णालय परिसरातील बांधकाम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांची धावपळ थांबणार आहे. महापालिकेचे अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली. येथील पहिल्या बॅचचे तिसरे वर्ष सुरू आहे.
सध्या प्रथम वर्षाचे वर्ग आणि प्रयोगशाळा मंगळवार पेठेतील सणस शाळेमध्ये भरतात. दुसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग आणि प्रयोगशाळा नायडू रुग्णालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहेत. वसतिगृह सणस मैदानाजवळ आहे. तृतीय वर्षाचे लेक्चर, प्रॅक्टिकल मंगळवार पेठेत होतात. प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिल्पा प्रतिनिधी म्हणाल्या, मेडिकल कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाचे वर्ग आणि लॅब नायडू रुग्णालयाच्या जागेत स्थलांतरित झाले आहेत. विद्यार्थी सकाळच्या वेळी कमला नेहरू रुग्णालयात क्लिनिकल प्रशिक्षण घेतात. वसतिगृह सणस मैदानामध्ये आहे. नायडू रुग्णालय परिसरातील वसतिगृहाचे काम सुरू आहे.
नायडू रुग्णालय बाणेरला स्थलांतरित करण्यात आले असून, रुग्णालयाच्या इमारतीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. सध्या तिथे दुसर्‍या वर्षाच्या पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कम्युनिटी मेडिसिन आणि फोरेन्सिक या विषयांच्या प्रयोगशाळा सुरू आहेत. नवीन वर्ग बांधण्याचे कामही पूर्ण झाले आहे. वसतिगृहाची इमारत सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी, अशी मागणी भवन विभागाकडे करण्यात आली आहे.

130 कोटींच्या तरतुदीची आवश्यकता

महाविद्यालयाची नवीन इमारत पाच मजली आणि रुग्णालयाची इमारत सहा मजली असणार असून, त्यासाठी 130 कोटी रुपये इतकी तरतूद लागण्याची शक्यता आहे. वसतिगृह इमारत आठ मजली असणार असून, यंदाच्या अंदाजपत्रकात आणखी तरतूद अपेक्षित आहे.
सध्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सी आकाराच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. प्रथम वर्षाचे वर्ग मंगळवार पेठ येथील वैद्यकीय महाविद्यालयात होतात. बांधकाम झाल्यानंतर पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही नायडू कॅम्पसमधील नवीन इमारतीत स्थलांतरित केले जाईल.
– डॉ. शिल्पा प्रतिनिधी,  प्रभारी अधिष्ठाता, अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज

हेही वाचा

Back to top button