घरोघरी जा, मोदींचे काम सांगा; जे. पी. नड्डांचे भाजप पदाधिकार्‍यांना आवाहन | पुढारी

घरोघरी जा, मोदींचे काम सांगा; जे. पी. नड्डांचे भाजप पदाधिकार्‍यांना आवाहन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी जा, साध्या-सोप्या भाषेत लोकांना मोदी सरकारची कामे समजावून सांगा. सर्वसामान्यांसारखेच साधे राहणीमान ठेवा. महागड्या गाड्या फिरवत सत्तेचे प्रदर्शन करू नका! भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बुधवारी मुंबईतील भाजप नेत्यांचा, पदाधिकार्‍यांचा एका अर्थाने क्लासच घेतला. मुंबईतील सर्व सहा जागांवर महायुतीचे खासदार निवडून आणण्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन करतानाच, नड्डा यांनी बारीकसारीक तपशिलांसह केलेल्या सूचना चर्चेचा विषय ठरल्या.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ‘अब की बार 400 पार’चा नारा देत भाजप कामाला लागला आहे. या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी नड्डा बुधवारी दोन दिवसांच्या मुंबई दौर्‍यावर आले आहेत. त्यांनी भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत नड्डा यांनी निवडणुकांच्या अनुषंगाने आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख आणि मुंबईतील भाजपचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकांसाठी दुसर्‍या टप्प्यातील प्रचारासाठी तयारीला लागण्याच्या सूचना नड्डा यांनी केल्या. सर्वसामान्य मतदारांसोबत कनेक्ट ठेवण्यासाठी लोकांमध्ये राहणार्‍या कार्यकर्त्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

Back to top button