Rajya Sabha Elections 2024 : सोनिया गांधी, जे. पी. नड्डा, अशोक चव्हाण राज्यसभेवर | पुढारी

Rajya Sabha Elections 2024 : सोनिया गांधी, जे. पी. नड्डा, अशोक चव्हाण राज्यसभेवर

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानातून राज्यसभेवर पोहोचल्या आहेत. आज त्यांची राज्यसभेच्या खासदारकीसाठी बिनविरोध निवड झाली. सोनिया गांधींसोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा गुजरातमधून, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव ओडिशामधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. (Rajya Sabha Elections 2024)

महाराष्ट्रात काँग्रेसमधून भाजपवासी झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांची तसेच शिवसेना शिंदे गटातर्फे मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसतर्फे चंद्रकांत हांडोरे यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे. (Rajya Sabha Elections 2024)

राजस्थानमधून सोनिया गांधींसह भाजपचे चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड हे बिनविरोध निवडून आले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ तसेच भाजपचे नेते भूपेंद्र सिंग राज्यसभेचा कार्यकाळ तीन एप्रिल रोजी संपत आहे. भाजपचे राज्यसभा सदस्य किरोडीलाल मीना यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर डिसेंबरमध्ये खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक झाली. काँग्रेसतर्फे वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि भाजपतर्फे चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड अशा तीन उमेदवारांनीच अर्ज भरल्यामुळे बिनविरोध निवडणूक झाली. दरम्यान, गुजरातमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.

Back to top button