Rohit Sharma : कोणत्याही खेळपट्टीवर आम्ही जिंकू शकतो; कर्णधार रोहितचा संघावर विश्वास | पुढारी

Rohit Sharma : कोणत्याही खेळपट्टीवर आम्ही जिंकू शकतो; कर्णधार रोहितचा संघावर विश्वास

राजकोट; वृत्तसंस्था : भारत फक्त फिरकीला अनुकूल खेळपट्टीवरच कसोटी सामने जिंकू शकतो, अशी टीका करणार्‍यांना कर्णधार रोहित शर्माने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सामन्यानंतर तो म्हणाला की, ‘भारतीय संघ कोणत्याही खेळपट्टीवर सामना जिंकू शकतो. केपटाऊन असो की राजकोट असो, कोणत्याही विकेटवर खेळून सामना जिंकण्याची आमच्यात ताकद आहे.’ रोहितच्या या शब्दांतून त्याचा संघाबद्दलचा जबरदस्त आत्मविश्वास दिसून येत आहे. (Rohit Sharma)

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसर्‍या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला. टीम इंडियाने राजकोटमध्ये इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला. विजयानंतर रोहित म्हणाला, ‘आम्ही यापूर्वी अशा विकेटस्वर अनेक सामने जिंकले आहेत. जिथे चेंडू वळतो, तीच आमची ताकद राहते. यामुळे आपल्याला संतुलन मिळते. आम्ही अनेक वर्षांपासून निकाल दिले आहेत आणि आम्ही भविष्यातही निकाल देत राहू.’ (Rohit Sharma)

‘दोन दिवसांत आपण काय करू शकतो?’

भारतीय कर्णधार म्हणाला, ‘गेल्या तीन सामन्यांतील खेळपट्ट्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या होत्या. हैदराबादमध्ये चेंडू वळत होता आणि खेळपट्टी संथ होती. विशाखापट्टणममध्ये चेंडू खाली राहत होता, तर राजकोटमध्ये फ्लॅट विकेट होती. खेळपट्टी बनवण्यावर आमचे नियंत्रण नसते,’ असे सांगून रोहित म्हणाला, ‘आम्ही सामन्याच्या दोन दिवस आधी मैदानावर पोहोचतो. तोपर्यंत खेळपट्टी तयार झालेली असते. मग या दोन दिवसांत आम्ही काय बदल करू शकणार? क्युरेटर ठरवतात आणि खेळपट्टी तयार करतात. जी खेळपट्टी असेल त्यावर सकारात्मक होऊन खेळणे एवढेच आमच्या हातात असते. कोणत्याही विकेटवर खेळून सामना जिंकण्याची आमच्यात ताकद आहे, एवढे मात्र मी ठामपणे सांगू शकतो. जेव्हा आम्ही दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे सामना जिंकला, तेव्हा ती विकेट कशा प्रकारची होती, हे सर्वांनाच माहीत आहे.’

हेही वाचा :

Back to top button