शिक्षण आणि लग्नाचा खर्च कसा करायचा? विवंचनेतून युवकाने जीवन संपवले | पुढारी

शिक्षण आणि लग्नाचा खर्च कसा करायचा? विवंचनेतून युवकाने जीवन संपवले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षणाला येणारा मोठा खर्च, त्यानंतर लग्नाचा व इतर आर्थिक खर्च कसे करणार या विवंचनेतून युवकाने कटरने स्वतःचा गळा कापून घेऊन जीवन संपवले. निरज विकास सरगडे (वय 23, रा. बागेश्री अपार्टमेंट सुधाकरनगर) असे त्या तरुणाचे नाव असून त्यांनी रविवारी रात्री साडेआठ वाजता राहत्या घरी ही घटना घडली.

याबाबतची माहिती अशी, एका खासगी महाविद्यालयात निरज इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. आजोबांच्या घरी आई व तो राहत होता. सकाळी त्याची आई कराड येथे गेली होती तर आजोबा शनिवारी रात्रीच मुंबईला गेले होते. निरज दुपारी २ वाजता घरी आला. त्याने सोबत नवीन इलेक्ट्रिक कटर आणले होते. टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी त्याने तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यानंतर कटरची पीन प्लगमध्ये घालून त्याने ते सुरु केले व स्वतःच्या गळ्याला लावले. कटरमुळे गळ्यावर खोलवर जखम झाल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. कटर चालू स्थितीत बराच वेळ तसाच सुरू होता.

कटरचा आवाज येऊ लागल्याने शेजारच्यांनी घराचे दार वाजवले. पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर शेजार्‍यांनी राजारापुरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार तोडण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही. त्यानंतर अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. दलाच्या जवानांनी दार उचकटून काढले. घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला निरज आढळला. तातडीने त्याला सीपीआरमध्ये हलवण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

इंग्रजीमध्ये सुसाईड नोट

निरजने इंग्रजीमध्ये सुसाईड नोट लिहीली होती. यामध्ये त्याने भविष्यात शिक्षणासाठी येणारा खर्च, आपल्या लग्नासाठी येणारा खर्च लिहून ठेवला होता. हा सारा खर्च भागवायचा कसा याची चिंता मनात आहे. असा उल्लेख सुसाईडनोटमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button