Lok Sabha Elections : हातकणंगलेतून शेट्टी, प्रतीक पाटील की रोहित पाटील? | पुढारी

Lok Sabha Elections : हातकणंगलेतून शेट्टी, प्रतीक पाटील की रोहित पाटील?

कोल्हापूर : लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यास काही काळ उरल्याने इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघात महाविकास आघाडीकडून माजी खा. राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील आणि त्यांचे भाचे कोल्हापूर राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांची नावे चर्चेत असल्याचे समजते.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यायचा विचार सुरू असला, तरी राजू शेट्टी यांची भूमिका अद्याप संभ—माची आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भाचा रोहित पाटील अथवा मुलगा प्रतीक पाटील यांनी उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्या असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कोल्हापुरात झालेल्या खा. शरद पवार यांच्या निर्धार सभेत रोहित पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

हातकणंगले मतदारसंघात खा. धैर्यशील माने शिंदे गटासोबत आहेत. राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत न आल्यास हा मतदारसंघ कोण लढवणार, हा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत पर्याय म्हणून जयंत पाटील यांच्या कुटंबात उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असून शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले तसेच जयंत पाटील यांच्या हक्काचे शिराळा, वाळवा विधानसभा मतदारसंघातील मतदान, काँग्रेसचे विरोधी पक्षाचे गटनेते आ. सतेज पाटील, आ. राजू आवळे, माजी आ. सुजित मिणचेकर, माजी आ. राजीव आवळे यांच्यामुळे येथे ताकद मिळू शकते. रोहित पाटील यांना लोकसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. कोल्हापुरातील सभेत खा. पवार यांनी युवकांना संधी देऊ, असे म्हटल्याने लोकसभेला कोणाला संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Back to top button