दररोज किती चालावे? | पुढारी

दररोज किती चालावे?

डॉ. सुनील जाधव

सध्या धावपळीच्या काळात पायी चालण्याची कला लुप्त होत चालली आहे. कारण, बैठे काम वाढल्याने लोकांकडे फिरायला वेळ राहत नसल्याचे दिसून येत आहे. पण, अलीकडच्या काळाते चालण्याचे महत्त्व लोकांना पटू लागल्याने महानगरातील मैदाने, बागा, टेकड्या, डोंगर पायी चालणार्‍या माणसांनी फुलून जात आहेत.

आपण नियमित व्यायाम करू शकत नसाल, तर दररोज दहा हजार पावले चालून फिट राहू शकता. अनेक संशोधनातून ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. दररोज दहा हजार पावले चालणेे हे आरोग्यासाठी व तब्येतीसाठी लाभदायी आहे. अनेकदा वैद्यकीय तज्ज्ञ हे व्यायामाबाबत रुग्णांना, नातेवाईकांना, मित्रांना, सहकार्‍यांना टिप्स देत असतात. दररोज किमान 45 ते 50 मिनिटे फिरावे, मॉर्निंग वॉक करावा, इव्हनिंग वॉक करावा, आहारावर नियंत्रण ठेवावे, दहा हजार पावले चालावे असे सांगण्यात येते. पण, दररोज दहा हजार पावले चालण्याचा सल्ला का दिला जातो, यावरून आपल्या मनात काही वेळा प्रश्न निर्माण होतात.

संशोधनातून स्पष्टीकरण

जगभरातील संशोधकांनी दररोज भरपूर चालण्यामुळे व्यक्ती तंदुरुस्त राहतो, यावर शिक्कामोर्तब केले आहे. दररोज किमान दहा हजार पावले चालणारा व्यक्ती हा फिजिकली अ‍ॅक्टिव्ह श्रेणीत मोडतो. तर किमान 5 हजार पावले चालणारा व्यक्ती हा सिडेंट्री लाइफस्टाईल म्हणजेच आळशी जीवनशैलीचे अनुकरण करणारा असतो. 5000 ते 7500 पावले चालणारा कमी सक्रिय, 12500 पेक्षा अधिक पावले चालणारा व्यक्ती हायली अ‍ॅक्टिव्ह समजला जातो. परंतु, दहा हजार पावले फिरणे आदर्श असून ही कृती केल्यास आपण दररोज पाच किलोमीटर चालतो, असे गृहित धरायला हवे.

ब्रिटनच्या ‘नॅशनल ओबेसिटी फोरम’ने या गोष्टीला मान्यता देत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आणि त्यानुसार चालण्यावर लक्ष ठेवण्यासाठी फिटनेस ट्रॅकर बँडही तयार केले. जागतिक संशोधन संस्था आयडीसीची ट्रॅकर वापरण्याबाबतची गोष्ट मान्य झाली आणि 2019 पर्यंत शंभर दशलक्ष ट्रॅकर उपकरणाची विक्री झाली. अशा प्रकाराच्या आरोग्य उपकरणाच्या मदतीने आपण दिवसभरात किती पावले चाललो किंवा सकाळच्या वेळी किती फिरलो याचे आकलन होते. त्याचवेळी किती कॅलरी बर्न झाली याचेही विवरण दिले जाते.

पायी चालणे सर्वार्थाने फायदेशीर

बेस्ट सेलर बुक ‘मानपो केई: द आर्ट अँड सायन्स ऑफ स्टेप काउंटिंग’च्या लेखिका कॅटरिन टुडोर लॉक यांनी दररोज दहा हजार पावले चालण्याचे महत्त्व विशद केले. या संदर्भात त्यांनी टेनेसी यूनिव्हर्सिटीच्या एक्सरसाईज फिजिओलॉजीचे प्रोफेसर डॉ. डी. आर बॅसेट यांच्या समवेत एक वैद्यकीय पेपरही लिहला आणि विविध अभ्यासांती 10 हजार पावले दररोज चालण्यामुळे होणारे फायदे देखील सांगितले. नियमित चालण्यामुळे हेल्दी हार्ट, हेल्दी डायजेस्टिव्ह सिस्टम, बॉडी फिटनेस राहण्यास मदत मिळते. आतापर्यंत डझनभर संशोधकांनी हेल्दी हार्ट आणि स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह जीवनशैली असणे आवश्यक आहे. शारीरिक रुपाने असक्रिय लोकांत हदयविकार होणे आणि स्ट्रोकची शक्यता बळावते.

खबरदारी घ्या

कोणताही व्यायाम किंवा अ‍ॅक्टिव्हिटी सुरू करण्यापूर्वी आपण फिजिकल ट्रेनर किंवा डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा. आपण किती वेळ व्यायाम करू शकता आणि किती तीव्रतेने करु शकता, हेदेखील जाणून घ्या. कारण प्रत्येक व्यक्ती शारीरिक क्षमता वेगवेगळी असते.

Back to top button