किंग चार्ल्सच्या आजारपणामुळे कोहिनूरविषयी कथित शापाची चर्चा | पुढारी

किंग चार्ल्सच्या आजारपणामुळे कोहिनूरविषयी कथित शापाची चर्चा

लंडन : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे 2022 मध्ये निधन झाल्यानंतरब्रिटनच्या राजगादीवर आलेले किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. किंग चार्ल्स यांना प्रोटेस्ट ग्रंथींसंदर्भात तक्रार असून त्याच्या तपासणीदरम्यानच कर्करोगाचे निदान झाले, असेब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले. किंग चार्ल्स यांना झालेल्या कर्करोगासंदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे असतानाच आता त्यांच्या या आजारपणाचे एक अजब कोहिनूर कनेक्शनही सध्या चर्चेत आहे. हा हिरा पुरुषांना लाभत नाही, तसा त्याला शापच आहे असे म्हटले जाते. अर्थात किंग चार्ल्स यांनी राज्याभिषेकावेळी कोहिनूर असलेला मुकुट परिधान केलेला नव्हता. हा मुकुट क्वीन कॅमिला परिधान करतील का याचीही उत्सुकता होती; पण त्यांनीही वाद नको, म्हणून कोहिनूर असलेला मुकुट परिधान करणे टाळले होते!

कोहिनूर नेमका कुठे आणि कधी सापडला याबद्दल वेगवेगळे दावे केले जातात. त्यामुळेच या हिर्‍याचे गूढ आजही कायम आहे. मात्र, सर्वाधिक मान्यता असलेला दावा म्हणजे गोवळकोंडा प्रांतातील कोल्लूर खाणींमध्ये हा हिरा सापडला. सध्या हे ठिकाण तेलंगणमध्ये आहे. या हिर्‍याचा आकार आणि त्याच्या सौंदर्यामुळे तो फारच मौल्यवान आहे. त्यामुळेच हा हिरा ज्याच्याकडे आहे ती व्यक्ती शक्तिशाली असून तिच्याकडे भरपूर अधिकार आहेत असे समजले जाते. म्हणूनच हा हिरा सापडल्यापासून तो सत्ता आणि राजघराण्याचे प्रतीक मानला जातो.

मागील अनेक दशकांमधील कोहिनूर हिर्‍याचा प्रवास पाहिल्यास तो वेगवेगळ्या राजांच्या, संस्थानिकांच्या ताब्यात होता. हा हिरा मुघल सरदार शाहजहाँच्या मुकुटामध्ये होता. त्यानंतर हा हिरा 1739 रोजी पर्शियन आक्रमक नादर शाहने ताब्यात घेतला. बराच प्रवास करत हा हिरा अखेर शिख संस्थानिक रणजीत सिंह यांच्याकडे आला. 1839 मध्ये रणजीत सिंह यांचे निधन झाल्यानंतरब्रिटिशांच्या इस्ट इंडिया कंपनीने हा हिरा ताब्यात घेतला. हा हिरा बरेच राजकीय वाद आणि हेव्या दाव्यानंतर सध्याब्रिटिशांच्या ताब्यात असला तरी या हिर्‍याशी संबंधित एक दावा असाही केला जातो की याचा ताबा पुरुषांकडे असेल तर त्या पुरुषाला धोका निर्माण होतो.

जगातील सर्वात मोठ्या व सुंदर हिर्‍यांपैकी एक मौल्यवान हिरा अशी कोहिनूरची ओळख आहे. कोहिनूरसंदर्भातील अनेक दावे आणि दंतकथांपैकी एक असे सांगते की या हिर्‍याची मालकी पुरुषांकडे असेल तर त्या पुरुषावर संकट ओढावते, असा शाप या हिर्‍याला आहे. ज्या राजाकडे किंवा संस्थानिकाकडे हा हिरा आला त्याची अधोगती सुरू झाली.ब्रिटनमध्ये कोहिनूर घेऊन जाणार्‍या ईस्ट इंडिया कंपनीविरोधातही हिरा ताब्यात घेतल्यानंतर 1857 मध्ये उठावाचा सामना करावा लागला. बिटिशांनी हाच अजब योगायोग लक्षात घेत हा हिरा केवळ राजघराण्यातील महिलेकडे राहील असा प्रयत्न केला. आधीची महाराणी व्हिक्टोरियापासून ते महाराणी एलिथाबेथ दुसर्‍या यांच्यापर्यंत अनेक महाराण्यांकडेच हा हिरा राहिला.

Back to top button