विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शिक्षण : हर्षवर्धन पाटील | पुढारी

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शिक्षण : हर्षवर्धन पाटील

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) अंतर्गत शैक्षणिक संस्थांमधून आतापर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. आता संस्थेने एक पाऊल पुढे टाकत पिंपरी-चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) सुरू केले आहे. साते, वडगांव मावळ येथे विस्तीर्ण क्षेत्रात अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांनीयुक्त सुसज्ज, दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असे पीसीयुचे कुलपती व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

माध्यम प्रतिनिधींनी नव्याने सुरू झालेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठास (पीसीयु) बुधवारी भेट दिली. त्या वेळी कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी उपस्थित होते
पाटील म्हणाले, 16 जानेवारी 2023 मध्ये पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठाची घोषणा शासनाने केली.

6 मे 2023 मध्ये मान्यता मिळाली. त्यानंतर त्वरेने निर्णय घेत विद्यापीठाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविताना देशभरातून विद्यार्थी, पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे 93 हजार विद्यार्थ्यांनी चौकशी तर दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत. त्यातील दीड हजार विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. असे विद्यापीठाने अनेक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. प्रामुख्याने एमबीए इंटरनॅशनल, इंटरनॅशनल स्टडी टूर सॅप सर्टिफिकेशन, तसेच दुहेरी स्पेशलायझेशन-विपणन, वित्त, व्यवसाय विश्लेषण, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग आणि मीडिया व्यवस्थापन यासह विविध अभ्यासक्रमांचा त्यामध्ये समावेश आहे.

दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव विठ्ठल काळभोर, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई तसेच स्वत: मी या शैक्षणिक संस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे, असे पाटील यांनी नमूद केले. संस्थेत शिक्षण घेणारे 29 हजारांहून अधिक विद्यार्थी नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये चांगल्या पदांवर काम करत आहेत.

गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

विद्यापीठाच्या वतीने प्रतिभावान, गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे, अशी माहिती देऊन पाटील म्हणाले, आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, पश्चिम आफ्रिका, सार्क देश (अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका) आणि मध्य-पूर्वेकडील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे. त्याचप्रमाणे, देशातील विशिष्ट प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेसह विविध शिष्यवृत्त्या दिल्या जात आहेत, असे पाटील यांनी नमूद केले.

सुसज्ज शैक्षणिक सुविधा

पीसीयुमध्ये डिजिटल क्लासरूम, वाय-फाय कॅम्पस लायब्ररी, अद्ययावत प्रयोगशाळा, सर्व संगणक प्रणाली, ईआरपी यंत्रणा अशा सुसज्ज शैक्षणिक सुविधा आहेत. त्यासोबत विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र होस्टेल्स, लांब अंतरावरुन येत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बसव्यवस्था आदी सुविधा उपलब्ध आहेत.

हेही वाचा

Back to top button