Pune : कर्डेच्या सरपंचांची तत्परता अन् मोठा अनर्थ टळला... ! | पुढारी

Pune : कर्डेच्या सरपंचांची तत्परता अन् मोठा अनर्थ टळला... !

निमोणे : पुढारी वृत्तसेवा :  वेळ सकाळी दहाची… कर्डे (शिरूर) गावच्या मुख्य चौकात नागरिकांची व वाहनांची मोठी वर्दळ… जवळच असलेल्या गॅस एजन्सीत असलेल्या सिलिंडरपैकी एका सिलिंडरने अचानक पेट घेतला… त्यामुळे पळापळ आणि आरडाओरड सुरू होत चांगलाच गदारोळ माजला… त्यातूनही गावचे सरपंच आणि काही नागरिकांनी धाडस दाखवत सिलिंडरची आग नियंत्रणात आणली. त्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सरपंच आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही दुर्घटना टळली; अन्यथा अनर्थ झाला असता.
कर्डे येथील मुख्य चौकात गॅस एजन्सी आहे. या एजन्सीतीलच एका सिलिंडरला मंगळवारी (दि. 6) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे एजन्सीतील उपस्थितांची धांदल उडाली.

मोठी आरडाओरड सुरू झाली. या वेळी मुख्य चौकात देखील नागरिकांसह वाहनांची वर्दळ होती. एजन्सीतील व्यक्तींनी मोठ्या हिमतीने पेटलेला सिलिंडर बाहेर फेकला आणि ते आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र आग नियंत्रणात येत नव्हती. एजन्सीत इतर सिलिंडर असल्याने प्रचंड घबराट पसरली. अशातच तेथून जाणारे गावचे सरपंच सुनील इसवे, संजय जगदाळे, सतीश केदारी, मधुकर घायातडक, बाळासाहेब वाळके, मधुकर बांदल, राहुल पळसकर, मच्छिंद्र गोरे आदींनी धाडस दाखवत पेटत्या सिलिंडरकडे धाव घेतली. त्यानंतर सर्वांनी जवळच उभ्या असलेल्या वाहनांत असलेले फायर एक्सटिंग्विशर (अग्निशामक यंत्र) काढून आगीवर नियंत्रण मिळवले. सर्वांनी दाखविलेल्या धाडसाने मोठी दुर्घटना टळली.

Back to top button