शिरूर लोकसभेत महायुतीत खदखद; खेडमध्ये पहिली ठिणगी ! | पुढारी

शिरूर लोकसभेत महायुतीत खदखद; खेडमध्ये पहिली ठिणगी !

सुषमा नेहरकर-शिंदे

शिवनेरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यात महायुतीमध्ये खदखद असल्याचे उघड झाले आहे. खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात महायुतीत सहभागी झाल्याचा खेद व्यक्त केला. योजना मंजुरीचा श्रेयवाद, विकासकामांत घातली जात असलेली आडकाठी आणि राज्य सरकारच्या निधीतून झालेल्या विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजन कार्यक्रमांना आमदारांना डावले जात असल्याने ही नाराजी वाढली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महायुतीला स्थानिक नेते-कार्यकर्त्यांमधील खदखद महागात पडू शकते.

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांचे पारंपरिक विरोधक; पण याच विरोधकांचा सक्रिय गट राज्यात पुन्हा सत्तेत आला. महाआघाडी सरकारमध्ये देखील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात अडीच वर्षे एकत्र संसार केला. पण, शिरूर लोकसभेत या दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते एकत्र नांदले नाहीत. परंतु, राज्यात सत्तांतर होऊन पुन्हा भाजप व शिवसेना (एकनाथ शिंदे) गट एकत्र सत्तेवर आला. यात शिरूर लोकसभेतील बहुतेक सर्व शिवसैनिक शिंदे गटात सहभागी झाले. मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा ऐकणारा असल्याने शिंदे गटात उत्साहाचे वातावरण होते. परंतु, काही महिन्यांतच राज्यात पुन्हा महानाट्य होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. यात जिल्ह्यात सर्वाधिक वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील पाच आमदारांपैकी चार आमदार अजित पवार गटात सत्तेत सहभागी झाले.

महायुतीच्या या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्वांचे ऐकून घेणे व सर्वांना न्याय देण्याच्या भूमिकेमुळे महाआघाडीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते, कार्यकर्ते नव्याचे नऊ दिवस तरी एकत्र नांदले. पण, आता निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही पारंपरिक विरोधकांमधील धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे. खेड तालुक्यात चाकण पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटात सोशल मीडियातून शीतयुद्ध पाहायला मिळाले. खेड पंचायत समिती व प्रशासकीय इमारत मंजुरीमध्ये स्थानिक नेत्यांकडून आडकाठी घातली जात असल्याने आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा चांगला समाचार घेतला. आंबेगाव व जुन्नर तालुक्यात देखील स्थानिक आमदार आणि शिंदे गट यांच्यात सख्ख्य पाहायला मिळत नाही. यामुळेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचे भवितव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आमदारांच्या भूमिकेवर अवलंबून असणार, हे मात्र निश्चित.

लोकसभेसाठी धोकादायक
शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीमधील ही खदखद धोकादायक ठरू शकते. निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शिंदे गटाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जोरदार तयारीत आहेत. परंतु, सध्या आढळराव विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असेच चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहे. यामुळेच आढळराव पाटील व महायुतीच्या अन्य कोणत्याही उमेदवारासाठी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमधील खदखद धोकादायक ठरू शकते.

 

 

Back to top button