पार्कमध्ये फिरण्यासाठी गेल्यावर सापडला मौल्यवान हिरा! | पुढारी

पार्कमध्ये फिरण्यासाठी गेल्यावर सापडला मौल्यवान हिरा!

न्यूयॉर्क : कुणाचे नशीब कुठे व कसे चमकेल हे काही सांगता येत नाही. एका फ्रेंच व्यक्तीबाबत असेच घडले. तो अमेरिकेत सकाळी सकाळी पार्कमध्ये फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला रस्त्यात अशी वस्तू सापडली की त्यामुळे तो मालामाल झाला. अर्थात ज्यावेळी त्याला ही वस्तू सापडली, त्यावेळी त्याला ती इतकी महागडी असेल असे वाटले नव्हते. त्याला वाटले की हा काचेचा तुकडा असावा; पण तो निघाला कोट्यवधी रुपये किमतीचा हिरा!

ज्युलियन नवास हा फ्रेंच माणूस अमेरिकेत फ्लोरिडामध्ये एक रॉकेट लाँच पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी मित्रांनी न्यू ऑर्लियन्समध्ये बोरबॉन स्ट्रीट पाहण्याचे ठरवले. तिथे जात असताना त्यांना समजले की रस्त्यात क्रेटर ऑफ डायमंड पार्क आहे. या पार्कमध्ये हिरे सापडत असतात हे त्यांना ठावूक होते. त्यांनी या पार्कलाही भेट देण्याचे ठरवले व तिथे एक रात्र राहण्याचीही योजना आखली. पार्कच्या अधिकार्‍यांनी सांगितले की ज्युलियन पार्कमध्ये फिरत असताना त्याला एक चमकदार तुकडा सापडला.

आधी त्याला वाटले की हा काचेचा तुकडा असावा. त्याने तो खिशात ठेवला. त्याला आधीच एक सोन्याचा तुकडाही सापडला होता. मात्र, या ‘काचेच्या’ तुकड्यानेही नशीब उजळेल हे त्याला ठाऊक नव्हते. त्याने हा तुकडा एका तज्ज्ञाला दाखवला असात त्याने सांगितले की हा 7.46 कॅरेटचा हिरा आहे! त्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचेही त्याला समजले. डिसेंबरमध्येच या पार्कमध्ये एका व्यक्तीला 4.87 कॅरेटचा हिरा सापडला होता.

Back to top button