शनिवारवाडा इतिहास सांगणारा जिवंत शाहीर : इतिहास अभ्यासक मोहन शेटे | पुढारी

शनिवारवाडा इतिहास सांगणारा जिवंत शाहीर : इतिहास अभ्यासक मोहन शेटे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आज अयोध्येत जे होत आहे ते पेशव्यांचे स्वप्न होते, पेशव्यांच्या कागदोपत्री अनेकदा हा उल्लेख सापडतो की, शिवाजी महाराज यांची अशी इच्छा आहे की, उत्तरेतील तीर्थस्थाने मुक्त करावीत. त्या वेळी नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, सवाई माधवराव, महादजी शिंदे या सगळ्यांनी उत्तरेमध्ये जाऊन तीर्थस्थाने मुक्त करण्याचे काम केले होते. या सगळ्याचा इतिहास सांगणारा शनिवारवाडा ही केवळ वास्तू नाही, तर 250 वर्षांचा इतिहास सांगणारा जिवंत शाहीर आहे, असे मत इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी व्यक्त केले.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारवाड्याचा 292 वा वर्धापन दिन शनिवारवाड्याच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. या वेळी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुष्करसिंहजी पेशवा, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, जगन्नाथ लडकत, चिंतामणी क्षीरसागर, मोरेश्वर गांगल, रवींद्र कुलकर्णी, उमेश देशमुख, विश्वनाथ भालेराव या वेळी उपस्थित होते.
गोखले म्हणाले, एनडीएमध्ये बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. येणार्‍या कॅडेटना यामुळे स्फूर्ती मिळेल. अयोध्येत देखील प्रभू श्री रामाचे आगमन झाले आहे. शनिवारवाडा आणि श्री राम यांच्याकडून आजच्या दिवशी प्रेरणा घेऊया.

दिल्ली दरवाजा उघडला

कसबा पेठ : वर्धापन दिनानिमित्त सोमवारी ऐतिहासिक शनिवारवाड्याचा मुख्य दिल्ली दरवाजा उघडण्यात आला. भव्य रांगोळी, सनई-चौघड्यांचे सूर अन् श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि उदयसिंह पेशवा यांना या वेळी अभिवादन करण्यात आले. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवारवाड्याचा वर्धापन दिन समारंभ आयोजित केला होता.

भारत हजारो वर्षे धर्मभूमी, ज्ञानभूमी, संगीत, कला, साहित्य याने संपन्न भूमी होती. संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारी भूमी होती. परंतु, अनेक आक्रमणांमुळे ती पारतंत्र्यात गेली. देशातील अनेक पराक्रमी योद्ध्यांनी आपले बलिदान देऊन भारतभूमीला पारतंत्र्यातून मुक्त केले.

– मोहन शेट, इतिहास अभ्यासक

हेही वाचा

Back to top button