अयोध्येतील सोहळा हा राजकीय इव्हेंट : संजय राऊत | पुढारी

अयोध्येतील सोहळा हा राजकीय इव्हेंट : संजय राऊत

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील श्री रामलल्ला प्रतिष्ठापना हा देशभरातील जनतेच्या श्रद्धेचा विषय असला, तरी भाजपने तो राजकीय इव्हेंट बनवला आहे. राजकीय इव्हेंट उभा करण्यात भाजपचा हात कुणीच धरू शकत नाही. या माध्यमातून भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

आसाममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर भाजप सरकारच्या गुंडांनी हल्ला केल्याचे सांगत या लोकशाहीविरोधी कृत्याचा आम्ही निषेध करतो, असेही राऊत म्हणाले. ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने नाशिक दौर्‍यावर आलेल्या खा. राऊत यांनी सोमवारी (दि. 22) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी मतभेद करू इच्छित नाही. परंतु, जेवढे महत्त्व अयोध्येला आहे, तेवढेच नाशिकच्या पंचवटीला आहे. अधिवेशनाच्या रूपाने हुकूमशाहीविरोधातील संघर्षाला सुरुवात केली जाणार असून, नंतर अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले जाईल, असे राऊत यांनी सांगितले. अयोध्येतील सोहळा अभूतपूर्व आहे; पण त्याला भाजपने खासगी स्वरूप दिले आहे. त्यामुळेच देशातील मुख्य चार पीठांचे शंकराचार्य यांनीदेखील विरोध केला आहे.

फडणवीसांना उद्घाटनाचे निमंत्रण

अयोध्येतील शिवसेनेचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून ‘श्रीराम जन्मभूमीतील शिवसेनेचे वाघ’ या कारसेवकांच्या छायाचित्र, ध्वनिचित्रफितीचे प्रदर्शन अधिवेशनस्थळी आयोजित करण्यात आले आहे. नाशिकनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रदर्शन आयोजित केले जाईल. अयोध्येतील शिवसेनेच्या योगदानाविषयी फडणवीस यांना विस्मरण झाले आहे. त्यांना स्मरण व्हावे, यासाठी नागपूरमध्येही हे प्रदर्शन आयोजित केले जाईल. फडणवीस खरे श्रीराम भक्त असतील, तर त्यांनी या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला यावेे.

पुन्हा फडणवीसांना डिवचले…

कारसेवक फोटो ट्विटवरून खा. राऊत यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना डिवचले. ते म्हणाले की, काही लोक नागपूरची ट्रेन पकडायला गेले, ते फोटो दाखवताहेत; मात्र अयोध्येत शिवसैनिक पोहोचले होते.

Back to top button