महादेव बाबर-डॉ. अमोल कोल्हे भेट; राजकीय क्षेत्रात खळबळ | पुढारी

महादेव बाबर-डॉ. अमोल कोल्हे भेट; राजकीय क्षेत्रात खळबळ

कोंढवा : पुढारी वृत्तसेवा : ‘आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची (ठाकरे गट) तयारी सुरू आहे. आम्ही वाट पाहातोय ती ‘मातोश्री’वरील आदेशाची! तो आमच्यासाठी अंतिम असेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार निवडून आणण्याची आमची तयारी आहे,’ असा विश्वास माजी आमदार महादेव बाबर यांनी व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेते (ठाकरे गट) महादेव बाबर यांची भेट घेतली.

यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. कोल्हे यांचा पराभव करण्याची खुणगाठ बांधल्याने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेल्या आव्हानानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. कोल्हे यांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मागील काही महिन्यांपासून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिरूरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आग्रही आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिनेच शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी बाबर यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

हेही वाचा

 

Back to top button