Manoj Jarange-Patil : मी तुमच्यात असो-नसो…जरांगे यांना अश्रू अनावर | पुढारी

Manoj Jarange-Patil : मी तुमच्यात असो-नसो...जरांगे यांना अश्रू अनावर

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकार सोबत माझं बोलणं झालेल नाही. त्यांच्याशी बोलण्याची काही गरज नाही. आम्ही आरक्षण मिळण्यावर ठाम आहोत. त्यांच्याशी बोलून काहीही फायदा नाही. मी ठिकाणाहूनच आमरण उपोषण करत मुंबईकडे रवाना होणार, सरकार जाणून बुजून आरक्षण देत नसेल तर मला टोकाचं पाऊल उचलावे लागेल. मला २६ जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण करायचंच आहे.  पण या ठिकाणाहुन आमरण उपोषण करत जाण्याचा माझा विचार आहे. समाजाला विचारून तो निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (Manoj Jarange-Patil)

Manoj Jarange-Patil : राजकीय सुफडा साफ करावा लागेल

मराठ्यांच्या ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या. २५० पेक्षा जास्त तरुणांनी बलिदान दिले. हे सरकार तरीही आम्हाला आरक्षण देत नाही. असे सांगताना मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले, त्यांच्या डोळ्यात पाणी आले. यांच्या पेक्षा निर्दयी कोणी नाही. एक महिना झाला आम्ही मुंबईला जाण्याची घोषणा केली. तरीही सरकारने लक्ष दिले नाही. यांनी आम्हाला बरबाद करायच ठरवलं असेल तर यांचा राजकीय सुफडा साफ करावा लागेल असा इशारा ही मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.

तुम्ही आरक्षण दिलं असतं तर मुंबईला जाण्याची वेळ आली नसती. मी समाजात असो अथवा नसो माझ्या छातीत गोळ्या जरी घातल्या तरी माघार घेणार नाही. मी तुमच्यात असो-नसो आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेवू नका. अशी भावनिक साद ही समाजाला त्यांनी घातली. आतापर्यंत काय-काय घडलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. मुंबईच्या आंदोलनात एकत्र ताकद दाखवा. मराठा समाजला माझी विनंती आहे. मी असेल नसेल एकजूट फुटू देऊ नका. एकी तशीच ठेवा. मराठा समाजाचा आता नाईलाज आहे. ७ महिने आम्ही  सरकारला दिले. आता आम्ही मुंबईला जाणार, आमच्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे राहा. असे मराठा समाजाला आवाहन त्यांनी यावेळी केले.

आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही

आम्ही आमचेही टप्पे पाडलेले आहेत. माझ्या सोबत किती लोक दिसतील माहीत नाही. पण मुंबई जवळ गेल्यावर हा आकडा कोट्यावधी आंदोलकांचा असेल. ही आता शेवटची लढाई आहे कुणीही घरी थांबू नका. आम्हाला वाटेला लावण्यासाठी या. जो उद्रेक करेल त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. शांतपणे चला. कुणीही व्यसन करू नका. कुणीही राग व्यक्त करू नका.

आज मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत काहीही नाही. सातत्याने फक्त निराशाच पदरी पडते आहे. जाणून-बुजून आम्हाला आरक्षण द्यायचं नाही हे सरकारच स्वप्न आहे. आम्ही आता त्यासाठी लढायला पुन्हा आरंभ केला आहे. मुख्यमंत्र्यांनी सतत वेळ मागितला आम्हीही दिला. आता आमची काय चूक आहे. ५४ लाख लोकांना प्रमाणपत्र द्या. त्यांच्या नातेवाईकांना लाभ द्या. पण हे देत नाही. वेळ आणि काळ येऊ द्या आरक्षण कुणी आडवल ते सांगतो असा निर्वाळाही त्यांनी दिला.

Manoj Jarange-Patil : आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे

गावो-गावी मोर्चात सहभागी झालेल्या लोकांच्या जेवणाची मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे. लोकांचे हाल होणार नाही याची काळजी घेतली आहे. समाजाची संख्या लोकांना दाखवण्यात आम्हाला मोठेपणा नाही. आता आज इथे जास्त गर्दी झाली असती तर नियोजन कोलमडून गेले असते. आज सगळं नियोजनानुसार सुरू आहे. आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे. सांगितल्याप्रमाणे मराठा जमला याचा मला गर्व आहे. मला जातीचा गर्व आहे अशी जात होणे नाही. आरक्षणासाठी जीवन संपवले आहे. कर्ता पुरुष गेल्याने आता तो परत येणार नाहीय. आरक्षणासाठी आता मराठ्यांची कोणत्याही टोकाची भूमिका आहे. आता आरक्षणासाठी वारंवार आंदोलनं नाही. आरक्षणासाठी कुणी एकत्र आले काय आणि नाही काय, मुंबईच्या गल्ली-गल्लीत मराठेच दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जरांगे यांना अश्रू अनावर

या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही. मी तुमच्यात असो-नसो आरक्षणाचा माझा विचार मरु देऊ नका. आंदोलन सुरूच ठेवा, समाजासाठी शेवटपर्यंत लढणार. आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांची आठवण माझ्या डोळ्यासमोर आली म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आता बघ्याची भूमिका आम्ही घेणार नाही. सरकारला आता निट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा निश्चय त्यांनी व्यक्त केला. काल पासून मी आरक्षणासाठी गेलेल्या बलिदानामुळे व्यथित झालोय. गेलेल्या बलिदानामुळे त्यांच्या कुटुंबीयांना काय वाटत असेल. आता ही शेवटची लढाई आहे. मुंबईला चला. मला तिथेही जीवाची बाजी लावायची आहे. बलीदान गेलेल्या भावांची स्वप्न साकार करण्याची वेळ आता आली आहे. आमरण उपोषण येथूनच सुरू करायचं की तिथे सुरू करायच हे समाजाला विचारणार.

 बच्चू कडू आंदोलक म्हणून  मोर्चात सहभागी होणार

नोंदी सापडूनही तुम्ही आरक्षण देत नाही. त्यामुळे आम्हाला लढावे लागतंय. सरकारच्या दरबारात मरण आलं तर चांगल. मराठा आंदोलकांना नोटीस देणं केसेस करणं हा आता सरकारचा धंदा झाला आहे. आम्हाला कुणीही आडवू शकत नाही. लोक घर सोडायला लागलेत. लाखो लोक टप्पा-टप्प्याने आंदोलनात सहभागी होणार. मराठ्यांच्या लेकरांच्या अंगावर गुलाल टाकणार, तोपर्यत लढणार. आरक्षण मिळवणार आता माघार घेणार नाही. सरकार सोबत चर्चा सुरू राहू द्या असे काही जणांनी आम्हाला सांगीतले आहे. आ बच्चू कडू राजकारणी किंवा नेता म्हणून नाही आंदोलक म्हणून ते मोर्चात सहभागी होणार आहेत.

 छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध केला आहे. या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले की, त्या बदग्याचं काही विचारू नका अशी टीका भुजबळ यांचं नाव न घेता त्यांनी केली. तसेच मला त्याच्यावर काही बोलायचे नाही असे ते म्हणाले.सरकार आमच्या सोबत गनिमी कावे खेळत आहे,त्यामुळे आमची संख्या आज कमी दिसेल.मुंबईत ३ कोटी मराठे प्रवेश करतील.

हेही वाचा 

Back to top button