पुरंदरचा वाटाणा बाजारात खातोय भाव : किलोला साठ ते सत्तर दर | पुढारी

पुरंदरचा वाटाणा बाजारात खातोय भाव : किलोला साठ ते सत्तर दर

दिवे : पुढारी वृत्तसेवा : या वर्षी तीव्र दुष्काळी स्थितीमुळे पुरंदर तालुक्यातील सुप्रसिद्ध, चविष्ट अर्कल व गोल्डन या जातीच्या वाटाणा पिकाचे अत्यल्प उत्पादन झाल्याने बाजारपेठेत हा वाटाणा भाव खात असून प्रतिकिलो 60 ते 70 रुपये दर मिळत आहे. वाटाणा हे पीक पुरंदर तालुक्यातील मुख्य पीक आहे दरवर्षी तालुक्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल या पिकातून होत असते. राज्यभरातील खवय्ये पुरंदरच्या गोड वाटाण्याची अगदी आवर्जून वाट पाहत असतात, परंतु या वर्षी पावसाचे पाठ फिरवल्याने वाटाणा उत्पादक शेतकर्‍यांनाच वाटाणा विकत घेण्याची वेळ आली आहे.

वाटाण्याचे उत्पादन हे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर तसेच दिल्ली या ठिकाणी सर्वाधिक घेतले जाते. महाराष्ट्रात पारनेर आणि पुरंदर भागात वाटाण्याची पेरणी केली जाते, मात्र पुरंदरचा वाटाणा आपल्या अप्रतिम चवीने राज्यात प्रसिद्ध आहे. आजसुध्दा पुणे, मुंबई येथील बाजारपेठेत बाहेरील वाटाण्याच्या तुलनेत पुरंदरच्या वाटाण्याला जास्तीचा बाजारभाव मिळत असतो. दुष्काळी परिस्थितीत पुरंदर उपसा जलसिंचन योजना व बोअरवेलच्या पाण्यावर दिवे येथील प्रगतशील शेतकरी नितीन टिळेकर, रेश्मा टिळेकर या दाम्पत्याने आपल्या तीस गुंठे क्षेत्रावर दीड महिन्यांपूर्वी वाटाण्याची पेरणी केली होती.

पाणी बचतीसाठी रेनपाईपचा वापर केला. यावर्षी कडाक्याची थंडी असल्याने वाटाण्यासाठी पोषक वातावरण असल्याने वाटाणा जोमदार आला. सध्या या वाटाण्याची तोडणी सुरू आहे. पहिल्याच तोड्याला सातशे ते आठशे किलो माल सापडेल, असे नितीन टिळेकर यांनी सांगितले. सध्या पुरंदरच्या वाटाण्याला किलोला साठ ते सत्तर रुपये बाजारभाव मिळत असल्याने टिळेकर यांच्या कष्टाचे चीज झाले आहे. यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. हा वाटाणा दिवे येथील बाजारात विक्रीसाठी नेला जाईल त्यामुळे विक्रीपश्चात खर्चात देखील बचत होणार आहे. अजून किमान दोन तोडे या वाटाण्याचे होतील. वाटाण्यासह टिळेकर यांच्याकडे सीताफळाची दोनशे व अंजीर शंभर झाडे आहेत. टिळेकर यांना शेती कामात आई रत्नमाला, वडील चंद्रकांत हे मदत करतात.

तुरळक शेतकर्‍यांनाच मिळतोय लाभ

पुरंदर तालुक्यातील स्थानिक सासवड, दिवे बाजारपेठेत पेण, मुंबई, सांगली, सातारा, महाड येथील व्यापारी खरेदीसाठी गर्दी करतात. वाटाणा खरेदी करण्यासाठी आलेले व्यापारी इतर मालदेखील खरेदी करतात, त्यामुळे बाजारात मोठी उलाढाल होत असते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तुरळक ठिकाणी वाटाण्याची पेरणी झाली आहे. वाटाण्याला यावर्षी बाजारभाव मिळत असला तरी काही तुरळक शेतकर्‍यांनाच याचा फायदा होत आहे.

हेही वाचा

Back to top button