Makar Sankranti : मकर संक्रांत; बेळगावच्या तिळगुळाच्या दागिन्यांची विदेशात गोडी | पुढारी

Makar Sankranti : मकर संक्रांत; बेळगावच्या तिळगुळाच्या दागिन्यांची विदेशात गोडी

बेळगाव; संदीप तारिहाळकर : पारंपरिक कला व व वैशिष्ट्यपूर्ण परंपरा बेळगावकर जपत असल्याने येथे विविध उत्सवांचे वेगळेपण शेकडो वर्षानंतरही टिकून आहे. गणेशोत्सव, शिवजयंती या मोठ्या उत्सवाबरोबर येथील मकरसंक्रांतही वैशिष्ठ्यपुर्ण ठरली आहे. याचे कारण म्हणजे येथे तयार होणारे तिळगुळांचे दागिने. या दागिन्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत असून दरवर्षी लाखो रुपयांचे दागिने विदेशात विकले जातात. 1942 पासून बेळगावात सुरु झालेली ही परंपरा आजही तितक्याच कलात्मकतेने सुरु आहे.

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येथील बाजारात 25 हून अधिक प्रकारचे तिळगुळांचे दागिने ग्राहकांचे मन वेधून घेत आहेत. 1942 साली येथील परांजपे या घराण्यातील पुरुषांनी ही परंपरा सुरु केली. आज या व्यवसायात अनेक महिला कार्यरत आहेत. दरवर्षी येथून सुमारे 30 लाख रुपयांच्या तिळगुळांच्या दागिन्यांची विविध विदेशात निर्यात होते. दरवर्षी मकर संक्रांत उत्सवादरम्यान एकूण ऊलाढाल 60 लाख रुपये इतकी आहे. यातून शेकडो महिलांना काम मिळत आहे.

शहरात राधिका बर्वे यांची तिसरी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांचे वडील रेखा साठे व विजय साठे यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले. शाहूनगर येथील भाग्यश्री चोरगे व सुवर्णा रायकर, स्वाती बैलूर, आरती आनुरे, कचेरी गल्लीतील भाग्यश्री कुलकर्णी यांच्यासह अन्य काही महिलांनी ही कला जोपासली आहे. रंगपंचमीच्या दुसर्‍या दिवसापासूनच केवळ साखर आणि पाणी यांच्याच वापराने तिळगुळ तयार करण्यास प्रारंभ करतात. पहाटे

कडाक्याच्या थंडीमध्ये साखर आणि पाणी उकळून घेऊन ते मिश्रण घुसळले जाते. त्यानंतर आपोआप तिळगुळ तयार होऊन त्यावर काटे निर्माण होतात. यानंतर हेच तिळगुळ दागिन्यांसाठी वापरले जातात. काही महिला बाजारात तयार मिळत असलेले तिळगुळही दागिन्यांसाठी वापरतात.

सद्यस्थितीत अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युएसएसह अन्य विविध देशांमध्ये स्थायिक झालेल्या मूळ भारतीय लोकांकडून तसेच चेन्नई, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र मधूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मुलांच्या पहिल्या वाढदिवसाला तसेच गर्भवती महिलांच्या डोहाळे कार्यक्रमांना असे दागिने खरेदी केले जात आहेत.

येथे तिळगुळांपासून कंबरपट्टा, मंगळसूत्र, पोहेहार, लक्ष्मीहार, बाजुबंद, नथ, कर्णफुले, अंगठी, बासरी, मांगटिक्का तसेच पुरुषांसाठी लागणारे हार, घड्याळकडे, कंठी आदीसह एकूण 25 हून अधिक प्रकारात दागिने मिळतात.

प्रतिक्रिया
मी गत 14 वर्षापासून तिळगुळाचे दागिने तयार करत आहे. यातून अनेक जणांना रोजगारही मिळत आहे. मात्र या व्यवसायात नव्या पिढीतील सदस्यांची संख्या कमी होत आहे. दरवर्षी शहर उपनगरात तिळगुळांच्या दागिन्यांतून सुमारे 50 लाख रुपयांची ऊलाढाल होते.
– राधिका बर्वे, तिळगुळांचे दागिने निर्माती, किर्लोस्कर रोड,

Back to top button