विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा | पुढारी

विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा

शहाजी शिंदे, संगणकप्रणाली तज्ज्ञ

यावर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताकडून मोठ्या यशाची अपेक्षा आहे. अवकाश संशोधन, दूरसंचार, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह विकसित देशांसमवेतचे करार व शास्त्रज्ञ, तज्ज्ञ आणि संबंधित संस्थांनी स्वीकारलेली जबाबदारी पाहता भारताकडून उल्लेखनीय पाऊल पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विज्ञान क्षेत्रातील गेल्यावर्षीच्या काही कामगिरींच्या आधारावर यावर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताकडून मोठ्या यशाची अपेक्षा आहे. याशिवाय संशोधनाच्या पातळीवरदेखील देश आघाडी घेईल, अशी चिन्हे आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या वर्षात भारताकडून अनेक उल्लेखनीय कामगिरींची अपेक्षा आहे. यापैकी काही गोष्टी याचवर्षी साध्य होतील, असा कयास आहे. यामागचे कारण म्हणजे गेल्यावर्षी भारताने केलेली अतुलनीय कामगिरी. सरकारी पातळीवरच्या सकारात्मक हालचाली आणि विकसित देशांसमवेतचे करार पाहता शास्त्रज्ञ, तज्ज्ञ आणि संबंधित संस्थांनी स्वीकारलेली जबाबदारी पाहता भारताकडून उल्लेखनीय पाऊल पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्यावर्षी काही योजनांवर काम सुरू झाले आणि पैकी काही गोष्टी आज तडीस जाण्याची शक्यता आहे.

‘एआय’मध्ये नावीन्यपूर्ण गोष्टी

‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आपला देश सर्वात आघाडी घेण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत भारताने चांगली कामगिरी नोंदविली आहे. भारत 2024 मध्ये ‘ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच ‘जीपीएआय’चे अध्यक्षपद भूषविणार आहे. त्यामुळे भारताकडून आश्चर्यकारक कृती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या चॅटजीपीटीला केवळ पर्यायच नाही, तर त्यापेक्षा अधिक पटीने पुढे जात 12 भारतीय भाषांसह 120 भाषांत त्याचे सादरीकरण होण्याची शक्यता आहे.

‘6-जी’मध्ये सर्वात आघाडी

इंटरनेटच्या क्षेत्रात ‘फाईव्ह जी’नंतर आता यावर्षीच्या अखेरीस ‘6-जी’ तंत्रज्ञान लाँच होण्याची शक्यता आहे. ही गोष्ट साध्य झाली तर आपण या बाबतीत जपानलाही मागे टाकू शकतो. कारण जपान अजूनही ‘6-जी’वर काम करत आहे. त्यामुळे ही बाब क्रांतिकारी बदल घडवून आणणारी राहू शकते.

‘इस्रो’चे नवे प्रकल्प

‘इस्रो’ यावर्षी महत्त्वाकांक्षी गगनयान मोहीम लाँच करेल. निर्णायक प्रक्षेपण करण्याच्या अगोदर काही चाचण्या करेल, सुरक्षेची चाचपणी करेल. शिवाय ‘इस्रो’ यावर्षी सुमारे दहा महत्त्वाच्या मोहिमा आखणार आहे आणि काही उल्लेखनीय तंत्रज्ञानाचा विकास करून जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरीची नोंद करणार आहे. ‘इस्रो’ ‘इसीएलएसएस’सारखी प्रणाली स्वत: विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारत आतापर्यंत केवळ उपग्रह आणि रॉकेटची निर्मिती करत होता. परदेशी अंतराळ संस्थांशी झालेल्या करारानुसार ‘इसीएलएसएस’ तंत्रज्ञान मिळवून या क्षेत्रातही स्थान निर्माण करेल, अशी आशा होती. मात्र, चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्यानंतरही कोणताही देश पुढे आला नाही. परिणामी, त्याने स्वत:च हे तंत्रज्ञान विकसित करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी या क्षेत्रातील विकास मैलाचा दगड म्हणून सिद्ध झाला आहे. त्यामुळे ‘आदित्य एल-वन’ आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर लँगरेंज पॉईंटवर पोहोचले आहे, ही एक मोठी कामगिरी आहे.

यावर्षी ‘इस्रो’ पीएसएलएव्ही, जीएसएलव्ही आणि एलबीएम-3 च्या माध्यमातून उपग्रहांना सोडणार आहे. ‘एसएसएलव्ही’चे तिसरे उड्डाण, त्याचबरोबर गगनयान कार्यक्रमानुसार दोन मानवरहित मोहिमांची आखणी केलेली असताना ‘इस्रो’ इन्सॅट थ्रीडीएस, एक्सरे, पोलरोमीटर आणि दुसरा महत्त्वाचा उपग्रहदेखील सोडणार आहे. यावर्षीच्या अखेरीस शुक्र यानाचीदेखील तयारी केली आहे, तर मध्यात मंगळयान-2. ‘गगनयान मिशन’मध्ये मानवी सुरक्षा निश्चित करण्यासाठी इंजिनिअरिंग प्रणाली अणि मानवकेंद्रित प्रणालीसह विविध नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानातील विकासाचे परिणाम यंदा पहावयास मिळतील. विविध परिस्थितीत उपयुक्त ठरणार्‍या गगनयान क्रु एस्केप सिस्टीमसाठी एक चाचणी वाहनाचा उपयोग करण्यासाठी अनेक उपक्षेत्रीय मोहिमांची योजना कार्यान्वित केली जाणार आहे. महाराष्ट्रातील हिंगोलीत एलआयजीओ इंडिया नावाने एक लेसर इंटरफोरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्जर्व्हेटरी यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. ही यंत्रणा ब्लॅकहोल आणि न्यूट्रन स्टारसारख्या महाकाय खगोलीय भौतिकी वस्तूंच्या विलीनीकरणादरम्यान निर्माण होणार्‍या गुरूत्वाकर्षणाच्या लहरी टिपण्यास सक्षम राहील. एकुणातच या क्षेत्रात यावर्षी उल्लेखनीय प्रगती होऊ शकते.

कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानात प्रगती

हॅकिंग, डेटाचोरी पाहता सायबर सुरक्षा हे एक चिंतेचे मोठे कारण आहे. त्यामुळे ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानात प्रगती होणे स्वाभाविक आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प यावर्षीदेखील पूर्ण होणार नाही. मात्र, क्रिप्टोकरन्सी, पदार्थ विज्ञानात क्रांती करण्यात क्वांटम कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीत महत्त्वाची प्रगती पहावयास मिळू शकते. यावर्षी मेटावर्सचा वेगाने विकास होऊ शकतो. काही तज्ज्ञांच्या मते, मार्क झुकेरबर्ग 2024 मध्ये मेटावर्सला चालना देतील आणि त्याचे परिणाम भारतातही दिसतील. विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक आणि उद्योजक तसेच विज्ञानप्रेमींना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय विज्ञान नवव्या महोत्सवाचे आयोजन 17 ते 20 जानेवारी रोजी हरियाणाच्या फरिदाबाद येथे करण्यात आले आहे. एकुणातच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर भारतासाठी नवे वर्ष उत्साहवर्धक राहू शकते.

Back to top button