टीव्ही अँकरने लाईव्ह कार्यक्रमात दिली स्वतःच्या कर्करोगाची माहिती | पुढारी

टीव्ही अँकरने लाईव्ह कार्यक्रमात दिली स्वतःच्या कर्करोगाची माहिती

वॉशिंग्टन : अमेरिकेतील टीव्ही अँकर सारा सिडनर यांनी अत्यंत धाडसीपणे एका लाईव्ह कार्यक्रमात आपल्याला कर्करोग झाला असल्याचा खुलासा केला. आपण कर्करोगाच्या तिसर्‍या टप्प्याशी लढा देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये 51 वर्षीय सारा सिडनर सांगत आहेत की, त्यांच्या केमोथेरपीचा दुसरा महिना सुरू आहे. तसेच त्यांची रेडिएशन ट्रिटमेंट सुरू असून, डबल मेस्टेटोमी होणार आहे.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत सिडनर लाईव्ह कार्यक्रमात लोकांना कर्करोग होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करतात. यावेळी त्या आठ पैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग होतो, अशी माहिती देतात. आपल्याला कर्करोग झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले. त्या सांगतात की, त्यांची जीवनशैली चांगली आहे आणि कुटुंबातील कोणालाही कर्करोग झालेला नाही; पण त्यानंतरही आपण त्याच्या विळख्यात अडकलो आहोत. त्या सांगतात, ‘मी माझ्या मित्रांमधील आठ पैकी आहे.‘ मी माझ्या आयुष्यात एकदाही आजारी पडलेली नाही.

मी धुम्रपान करत नाही. मद्यपानही फार कमी करते. माझ्या कुटुंबात कोणालाही स्तनाचा कॅन्सर झालेला नाही. पण, तरीही मी स्टेज 3 कॅन्सरने पीडित आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. सारा सिडनर पुढे सांगतात की, ‘तर माझ्या सर्व बहिणींनो, सावळ्या, गोर्‍या सर्वांनी काळजी घ्या. आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करा. कॅन्सर होण्याआधीच तो समजून घेण्याचा प्रयत्न करता. मला निवडल्याबद्दल मी कॅन्सरचे आभार मानते. मला इतकं समजलं आहे की, आयुष्यात तुम्ही कितीही नरकयातना सोसत असलात, तरी अद्यापही मी वेड्याप्रमाणे या आयुष्यावर प्रेम करते.

आपले अश्रू रोखत त्या पुढे सांगतात की, ‘फक्त जिवंत राहणं हे माझ्यासाठी वास्तवात वेगळं आहे. मी आता जास्त आनंदी आहे. कारण, मूर्ख वाटणार्‍या अनेक छोट्या गोष्टींकडे मी लक्ष देत असे, ज्या मला सतावत होत्या’. सिडनर यांच्या धाडसाचं लोक कौतुक करत आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडमध्येच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांची आई आफ्रिकी-अमेरिकी आणि वडील बि—टिश आहेत. सीएनएन न्यूज सेंट्रलच्या त्या को-होस्ट आहेत.

Back to top button