भाजप, शिंदे गटाच्या कामांना अजित पवारांची सहमती; बॅकफूटवर आल्याची चर्चा | पुढारी

भाजप, शिंदे गटाच्या कामांना अजित पवारांची सहमती; बॅकफूटवर आल्याची चर्चा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा नियोजन समितीची मे 2023 मध्ये तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यातील कामांना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे अजित पवारांना दोन पावले मागे यावे लागल्याची चर्चा आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधील कामे वाटपावरून महायुतीतील सदस्यांमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर तब्बल नऊ महिन्यानंतर बुधवारी (दि. 10 जानेवारी) बैठक घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री तथा नवनियुक्त पालकमंत्री अजित पवार यांनी दोन पाऊल मागे घेत तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या अखेरच्या बैठकीतील कामकाजांच्या याद्यांना मंजुरी देण्याबाबत तोंडी सहमती दर्शवली आहे.

जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने झाली. काही आमदार आणि सदस्य प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होते. या बैठकीची सूचना काही तासांपुर्वी सदस्यांना देण्यात आली. बैठकीचा अंजेडाही मिळाला नाही, त्यामुळे काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार गटाचे आमदार आणि सदस्यांना वाढीव निधी देण्यावरून महायुतीमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या बैठकीत भाजपा आणि शिंदे गटाचे सदस्य आक्रमक भूमिका घेतील, अशी शक्यता होती. पालकमंत्री अजित पवार यांनी शिंदे गटाची कामे जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करावीत, असे सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा

Back to top button