अवकाळीने ज्वारी झाली भुईसपाट; शेतकरी बेजार | पुढारी

अवकाळीने ज्वारी झाली भुईसपाट; शेतकरी बेजार

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 5) रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील सर्व 97 महसुली मंडलांत पावसाची नोंद झाली आहे. या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नगर तालुक्यातील खंडाळा येथे या अवकाळी पावसाने शेतकरी द्रौपदाबाई बाजीराव इथापे यांच्या शेतातील हुरड्यात आलेली सुमारे अडीच एकर क्षेत्रातील ज्वारी भुईसपाट झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

यंदा पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मात्र हिवाळा सुरू झाल्यावर अनेकदा अवकाळी पाऊस झाला आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकर्‍यांना मिळालेली नसतानाच पुन्हा शुक्रवारी (दि.5) रात्री जिल्ह्यात सर्वच भागात अवकाळी पाऊस बरसला. नोव्हेंबर महिन्यात शहर व जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 44 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ हवामान, तर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला.

हा पाऊस शेतात उभ्या गहू, हरभरा, कांदा आदी पिकांसाठी नुकसानदायक ठरणार आहे. पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता असून, या पावसाने पिकांच्या उत्पादनात घट येणार आहे. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या शेतात हुरड्यात आलेल्या गहू, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नगर तालुक्यात अनेक गावांत हे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील खंडाळा गावच्या शिवारात शेतकरी द्रौपदाबाई बाजीराव इथापे यांच्या शेतातील हुरड्यात आलेली सुमारे अडीच एकर क्षेत्रातील ज्वारी भुईसपाट झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यासह इतर शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा

Back to top button