जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, सुरेशदादा जैन यांचा भाजपला पाठिंबा

जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, सुरेशदादा जैन यांचा भाजपला पाठिंबा

जळगाव- काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तथा आमदार सुरेश दादा जैन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देवून आपण राजकारणातून आता निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे धोरण व  देश हितासाठी मी त्यांच्या पक्षातील उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे व भाजपच्या उमेदवारालाच आपण मतदान करणार असे माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले आहे. तसेच यासाठी आपल्यावर भाजपचा कोणताही दबाव नसल्याचे ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे संपर्क प्रमुखांनी त्यांच्यावर दबाव असल्याचे म्हटले आहे.

सुरेश दादा जैन यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली. दोन दिवसांनी दि. (13) मतदान होणार आहेत. अशात त्यांनी भाजपाला आपला पाठिंबा जाहीर केला व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना त्यांनी भाजपला मतदान करावे असे आवाहन केले आहे. कोणी काहीही आरोप करत असले तरी माझ्यावर कुणाचा दबाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गिरीश महाजन एक ते दीड महिन्यापूर्वीच मला म्हणत होते की, तुम्ही भाजपात आले आहेत असे जाहीर करून टाका परंतु मला कोणत्याच पक्षात जायचे नाही. जे चांगले काम करतील मी त्यांच्यासोबत असणार असल्याचे ते म्हणाले. मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. चांगले काम करणार त्याला मी पाठिंबा देईल. आता मोदी चांगले काम करीत आहे म्हणून मी त्यांचे समर्थन करत असून त्यांच्या उमेदवारास पाठिंबा देत आहे. गुलाबराव, गिरीश महाजन हे माझे मित्र आहेत. तसेच अनिल भाई हे माझे जुने सहकारी आहेत. मला चाहणारे लोक मला भेटत असतात, माझा दरवाजा सर्वांसाठी खुला आहे. सर्व पक्षातील लोकांची माझे संबंध आहे. त्यामुळे सर्वांचे माझ्याकडे वेलकम आहे. असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, जळगावला मतदान करण्यासाठी आलो असता माझे दोन वेगवेगळ्या पक्षांचे बॅनरवर फोटो दिसले. मी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांच्या वरिष्ठांशी बोलणे झालेले आहे. मला बाळासाहेबांनी आशीर्वाद देऊन मंत्री बनवले होते. पण विकासाच्या मुद्यावर मी भाजपसोबत जात आहे. मतदान हे गुप्त ठेवायचे असते मात्र मी जाहीरपणे सांगत आहे की, मी मोदीजींना व भाजपाच्या उमेदवारांना मी मतदान करणार आहे. माझ्यावर प्रेम करत असाल तर भाजपाला मतदान करावे असे आवाहन त्यांनी त्यांच्या समर्थकांना केले.

दादांवर दबाव, ते मनाने आमच्यासोबत

याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांना विचारले असता, दादांनी चाळीस वर्षाचा राजकारणात कधीच स्क्रिप्ट वाचलेले नाही. त्याच्यांवर नक्कीच कोणाचा तरी दबाव आहे. एक दोन तासात ते कळेलच असे ते म्हणाले. यावरूनच राजकारण कोणत्या थराला गेले आहे हे स्पष्ट होते. 83 वर्षाच्या शरद पवारांना हुतात्मा म्हणणारे व पराभव समोर दिसत असताना आता 81 किंवा 82 वर्ष वय असलेल्या दादांना स्क्रिप्ट लिहून देणे असे धंदे त्यांचे सुरू असल्याचा टोला त्यांनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता लगावला. दादांनी स्वाभिमानी राजकारण केले आहे. त्यांना एखाद्या पक्षाचे धोरण पटले नाही तर त्यांनी त्यावेळेस राजीनामा देऊन निवडणूक लढवून स्वाभिमान बाळगला आहे. आज त्यांच्याशी दिलखुलास चर्चा केलेली आहे. मात्र त्यांची बॉडी लँग्वेज वरून असे दिसले की ते शरीराने जरी तिकडे असले तरी मनाने आमच्या सोबत असल्याचा दावा संजय सावंत यांनी केला आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news