बांगलादेशात मतदानापुर्वीच ॲपमध्ये बिघाड तर १४ मतदान केंद्रे, २ शाळा जाळल्या | पुढारी

बांगलादेशात मतदानापुर्वीच ॲपमध्ये बिघाड तर १४ मतदान केंद्रे, २ शाळा जाळल्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Bangladesh Elections) आज मतदान होत आहे. निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. बांगलादेश संसदेच्या ३०० जागांसाठी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. ८ जानेवारीला निकाल आहे. संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. तसेच सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी जवळपास १४ मतदान केंद्रे आणि दोन शाळा जाळण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाच्या अॅपमध्ये बिघाड

बांगलादेश निवडणूक आयोगाच्या निवडणूक अॅपमध्ये ‘स्मार्ट इलेक्शन मॅनेजमेंट बीडी’ मतदानापूर्वी शनिवारी संध्याकाळी बिघाड झाला. निवडणूक आयोगाने मतदारांसाठी मतदान केंद्रांसह निवडणुकीशी संबंधित तपशील शोधण्यासाठी अॅप लाँच केले होते. ही तात्पुरती समस्या असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. ते लवकरच दुरुस्त केले जाईल. क्षमतेपेक्षा जास्त वापरकर्ते अॅपवर आल्याने ही समस्या उद्भवल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. (Bangladesh Elections)

३०० जागांसाठी १५०० उमेदवार रिंगणात

प्रमुख विरोधी पक्ष बीएनपीने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने सत्ताधारी अवामी लीगच्या विरोधात कोणताही मोठा राजकीय प्रतिस्पर्धी रिंगणात नाही. मुख्य लढत अवामी लीग आणि अपक्ष उमेदवारांमध्ये आहे. संसदेच्या ३०० जागांसाठी १५०० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आज ४२ हजार मतदान केंद्रांवर होणाऱ्या मतदानात एकूण ११.९६ कोटी नोंदणीकृत मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी एकूण २७ राजकीय पक्ष सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेत आहेत, ज्यामध्ये तृणमूल बीएनपी, इस्लामिक फ्रंट, कृष्णा श्रमिक जनता लीग आणि गण फोरम हे प्रमुख पक्ष आहेत. भारतातील तीन प्रतिनिधींसह १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय निरीक्षक बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकांवर लक्ष ठेवतील.

हेही वाचा : 

Back to top button