वाकड परिसरात 42 पत्राशेड तोडले : महापालिकेकडून कारवाई सुरू | पुढारी

वाकड परिसरात 42 पत्राशेड तोडले : महापालिकेकडून कारवाई सुरू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या बदलीनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अतिक्रमण कारवाई ठप्प आहे. त्यामुळे शहरभरात अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, गोदाम, टपर्‍या यांचे पेव फुटले आहे. कारवाई टाळाटाळ करणार्‍या महापालिका प्रशासनाने अखेर रावेत, वाकड, बीआरटीएस मार्ग परिसरात बुधवारी (दि.3) कारवाई सुरू केली आहे. कारवाईत एकूण 42 अनधिकृत पत्राशेड व वीट बांधकामे पाडण्यात आली आहेत.

ड क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश जाधव यांच्या अधिपत्याखाली कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, उपअभियंता शांताराम कोबल, कनिष्ठ अभियंता शाम गर्जे, कार्यालयीन अधिक्षक अरुणकुमार सोनकुसरे, बीट निरीक्षक अमोल शिंदे, वैभव विटकरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. अतिक्रमण पथकातील कर्मचारी, 28 एमएसएफ जवान, 16 महापालिका पोलिस, 6, मजूर, जेसीबी टेम्पो, गॅस कटर आदींच्या सहायाने कारवाई करण्यात आली. तसेच, रावेत परिसरातही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासन राजकीय दबावामुळे सातत्याने कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे सुरू केलेल्या या कारवाईत प्रशासन सातत्य राखणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील मुख्य 8 रस्ते अतिक्रमणमुक्त करणार अशी घोषणा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केली होती. मात्र, विविध कारणांमुळे प्रत्यक्षात अतिक्रमणविरोधी कारवाई मोहीम सुरू करण्यात अडचणी येत होत्या. दोन ते तीन दिवस कारवाई झाल्यानंतर ती बंद केली जात होती. सुटी, पोलिसांचा बंदोबस्त मिळाला नाही, कार्यक्रम, सण आदी कारणांमुळे कारवाई केली जात नव्हती.
अखेर महापालिकेने बुधवारपासून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू केली आहे. कासारवाडी नाशिकफाटा ते वाकड बीआरटी रस्त्यालगत भुजबळ चौक, मधुबन हॉटेल ते जगताप डेअरी चौक रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण अंदाजे 82 हजार 580 चौरस फूट क्षेत्रफळाचे अनधिकृत वीट बांधकाम व पत्राशेड पाडण्यात आले.

Back to top button