ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले : क्रांतीची धगधगती मशाल | पुढारी

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले : क्रांतीची धगधगती मशाल

गीताली वि. म., ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचा पट प्रचंड मोठा आहे. त्यामध्ये स्त्रीशिक्षण, जातिभेद निर्मूलन, विधवा माता, कुमारी मातांचा प्रश्न, दुष्काळी परिस्थितीत चालवलेली अन्नछत्रे, प्लेगच्या साथीमध्ये केलेले कार्य आदी अनेक पैलू आहेत. केवळ हाताला हात लावणारी धर्मपत्नी म्हणून त्या वावरल्या नाहीत, तर त्या एक क्रांतीची धगधगती मशाल होत्या. त्यांच्या जयंतीनिमित्त आधुनिक स्त्रियांकडे पाहताना सामाजिक न्यायाची जाणीव निर्माण करणे हे आताच्या आधुनिक स्त्रीला आवश्यक आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या कार्याची महानता आणि त्यांच्या विचारांची आजही किती गरज आहे, यावर पुन्हा प्रकाश टाकला असता बर्‍याच गोष्टी समोर येतात. अज्ञान, गतानुगतिकता, भ्रामक समजुती यामध्ये गुरफटलेल्या शुद्र, अतिशुद्र आणि स्त्रिया यांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी खूप मोठा प्रयत्न केला. त्यांचा विचार प्रामुख्याने मूलगामी आणि प्रगल्भ असा होता. केवळ वरवर शिक्षण म्हणजे अक्षर ओळख अशा पद्धतीचे शिक्षण न देता त्यांनी सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, आत्मसन्मान यासंदर्भातील शिक्षण दिले. त्यांनी स्त्रिया आणि शुद्रादीशुद्र लोकांमधील आत्मभान जागृत केले. सावित्रीबाई स्वतः बुद्धिमान होत्या. स्वतंत्रपणे विचार करणार्‍या होत्या. स्त्री शिक्षणाबाबत जोतिरावांचा मूळ विचार व्यापक होता. स्त्री ही आई असते. आई स्वतः जर शिक्षित असेल, चांगले संस्कार असलेली आणि स्वतंत्र आत्मसन्मान असणारी असेल, तर मुलाची जडणघडण उत्तम प्रकारेच होते, हे त्यांनी समाजाला पटवून दिले. त्यासाठीच त्यांचा सर्व भर स्त्रीशिक्षणावर होता.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर विचारांची मशाल सतत जागृत, पेटती ठेवली. स्त्रियांसाठीचे त्यांचे कार्य हे दूरगामी परिणाम करणारे ठरले. त्यांनी त्या काळात समाज परिवर्तनासाठी केलेल्या संघर्षामुळेच आज मुली-महिला शिकून घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे आज स्त्रियांची दिसणारी उन्नती, त्यांना मिळालेले स्वातंत्र्य हे सावित्रीबाईंच्या कार्याचे फलित आहे, हे विसरून चालणार नाही.

सावित्रीबाईंनी सामाजिक न्याय, विषमता नाहीशी होणे आणि आत्मसन्मान जागविणे हेच खरे शिक्षण अशी शिक्षणाची व्याख्या केली होती. त्या द़ृष्टीने खरोखरीच किती स्त्रिया शिक्षित झालेल्या आहेत, याचा विचार केला, तर एकीकडे खूप आशादायक चित्र आहे. स्त्रियांचा आत्मसन्मान जागा झालेला आहे. आत्मविश्वास वाढलेला आहे, त्या अर्थाजन करू लागल्या आहेत, विचारांनी आणि आत्मविश्वासाने स्त्रिया जाग्या झाल्या आहेत, असे दिसते; पण या सर्व बदलांमध्ये सामाजिक न्यायाचा मुद्दा पाहिला, तर त्या विषयीच्या जागरुकतेबाबत थोडी निराशाजनक स्थिती आहे. आज गुलामगिरीतून स्त्री बाहेर आली हे खरे आहे; पण मला शिक्षण, समता मिळत आहे, अर्थार्जन करण्याची संधी मिळत आहे, एवढ्यावरच ती थांबताना आढळत आहे. ही गोष्ट दुसर्‍या स्त्रीला मिळत आहे की नाही, त्यांच्यासाठी आणखी कोणत्या पद्धतीने काही काम केले पाहिजे, याविषयीची संवेदनशीलता आजही कमी असल्याचे दिसत आहे.

सावित्रीबाईंनी दुष्काळाच्या काळात अन्नछत्रे चालवली. हजारो मुलांना जेऊ घातले. यातून त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्य किती मोठे होते, हे दिसते. स्त्रीला तिच्या सामाजिक, कौटुंबिक जडणघडणीतून हा गुण मिळत असतो हे खरे; पण त्याचा वापर सावित्रीबाईंनी सामाजिक कार्यासाठी ज्याप्रकारे केला तो अद्वितीय होता. जोतिराव यांच्या ‘शेतकर्‍यांचा आसूड’ किंवा अन्य लिखाणामध्येही सावित्रीबाईंचे वैचारिक आणि प्रत्यक्ष योगदान होतेच. या पार्श्वभूमीवर आज शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्न किंवा इतर अन्य प्रश्नांविषयी शहरी स्त्रियांनी विचार करणे, त्यासाठी सजग असणे, हीच खरी सावित्रीबाईंना आदरांजली ठरू शकेल. आधुनिक स्त्रीने या सर्व पद्धतीने सामाजिक न्यायाची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. ती निर्माण करणे म्हणजेच सावित्रीबाईंच्या कार्याबद्दलची कृतज्ञता वाटणे आहे.

Back to top button