AUS vs PAK : रिझवानच्या विकेटबद्दल पीसीबी करणार आयसीसीकडे तक्रार | पुढारी

AUS vs PAK : रिझवानच्या विकेटबद्दल पीसीबी करणार आयसीसीकडे तक्रार

सिडनी, वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यातील दुसर्‍या कसोटीत मोहम्मद रिझवान याला तिसर्‍या पंचांनी बाद देण्यावरून पाकिस्तानमध्ये रडगाणे सुरू असून मेलबर्नमधील पंचगिरी आणि ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर झाला तो मुद्दा घेऊन पीसीबी आयसीसीत जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मद रिझवान वादग्रस्तरीत्या बाद झाला होता. आधी मैदानावरील पंचांनी रिझवानला नाबाद ठरवले होते, यावेळी रिझवाननेही मैदानावर चेंडू आपल्या कोपराजवळ लागल्याचे दाखवत नौटंकी केली होती. मात्र, तिसर्‍या पंचांनी चेंडू रिस्ट बॅडला लागून गेल्याचे सांगत त्याला बाद ठरवले होते. याच्यावर रिझवानने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीसीबी चेअरमन झाका अश्रफ यांनी क्रिकेट संचालक मोहम्मद हाफीजसोबत चर्चा केली असून मेलबर्नमध्ये पंचगिरी आणि ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर झाला हा मुद्दा ते आयसीसीत घेऊन जाणार आहेत.

रिझवानला बाद दिल्यानंतर हाफीज देखील नाराज झाला होता. सामना संपल्यानंतर त्याने पंचगिरीच्या बाबतीत सातत्याचा अभाव तंत्रज्ञानाचा कसोटीच्या निर्णयावर होणारा परिणाम हे मुद्दे अधोरेखित केले होते. (AUS vs PAK)

हाफीज पुढे म्हणाला की, मी खेळात तंत्रज्ञान वापरण्याच्या विरुद्ध नाही. मात्र जर यामुळे शंका आणि गोंधळ निर्माण होत असेल तर ते मान्य नाही. काही निर्णय हे समजण्यापलीकडचे होते. जर चेंडू स्टम्पला हिट करत असेल तर फलंदाज कायम बाद असतो. मला कळत नाही की अम्पायर्स कॉल तिथे का आहे.

Back to top button