Team India Penalised : टीम इंडियावर ICCची कारवाई! द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर ठोठावला दंड | पुढारी

Team India Penalised : टीम इंडियावर ICCची कारवाई! द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर ठोठावला दंड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Penalised : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने भारतीय संघावर दंडात्मक कारवाई केली आहे. याअंतर्गत प्रत्येक खेळाडूला मॅच फीच्या दहा टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच संघाचे डब्ल्यूटीसी गुणतालिकेतील दोन गुणही कमी करण्यात आले आहेत.

भारतीय संघ निर्धारित वेळेत 2 षटके राहिला मागे (Team India Penalised)

आयसीसीने शुक्रवारी (29 डिसेंबर) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आयसीसी एलिट पॅनलचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी भारतीय संघावर दंडात्मक कारवाई केली आहे. निर्धारित वेळेत भारतीय संघ दोन षटके मागे राहिला. त्यामुळे आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार हा स्लो ओव्हर रेटचा गुन्हा मानला जातो. अशा स्थितीत खेळाडूंना प्रत्येक षटकासाठी मॅच फीच्या 5 टक्के दंड आकारला जातो. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 षटके कमी टाकली. यामुळे त्याला मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने ही शिक्षा स्वीकारली आहे, त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नाही. मैदानी पंच पॉल रेफेल आणि लँगटन रुसेरे, तिसरे पंच अहसान रझा आणि चौथे पंच स्टीफन हॅरिस यांनी ही शिक्षा सुनावली.’

टीम इंडिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. मॅच फीसह संघाचे 2 गुणही कमी झाले आहेत. दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड तिसऱ्या, बांगलादेश चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे. (Team India Penalised)

संबंधित बातम्या

Back to top button