सिंहगड हाऊसफुल्ल ; वाहतूक कोंडीने पर्यटकांचे हाल | पुढारी

सिंहगड हाऊसफुल्ल ; वाहतूक कोंडीने पर्यटकांचे हाल

खडकवासला : सिंहगडावरील वाहनतळ सकाळी साडेसात वाजताच वाहनांनी फुल्ल झाला. त्यामुळे वाहनतळापासून थेट घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीत अडकलेल्या पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सकाळपासून घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. दूर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीत दीड ते दोन तास पर्यटक अडकून पडले. अरुंद घाटरस्त्यावर पर्यटकांनी वाहने उभी केल्याने वाहतूक कोलमडली. अरुंद घाटात वाहने उभी राहिल्याने एकेरी वाहतूकही ठप्प पडली. उन्मत्त पर्यटकांमुळे वनविभाग अक्षरश: हतबल झाला. घाटरस्त्यावरील वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने वनविभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वाईकर, संदीप कोळी व सुरक्षा रक्षकांना धावपळ करावी लागली.

सिंहगडावर दिवसभरात पंचवीस हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. मोठ्या संख्येने वाहने गडावर आल्याने दुचाकी व चारचाकी वाहनतळ हाऊसफुल्ल झाला. खालून येणार्‍या पर्यटकांचा ओघ सुरू असल्याने घाटरस्त्यावरील वाहतूक कोलमडली. पर्यटकांच्या प्रचंड गर्दीचा अंदाज न आल्याने वाहतूक नियोजन कोलमडले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरक्षा रक्षकांसह वनविभागाच्या अधिकार्‍यांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी दमछाक झाली. गेल्या रविवारपेक्षा आज सिंहगडावर पर्यटकांनी उच्चांकी गर्दी केली होती. सायंकाळनंतर वाहतूक कशीबशी सुरळीत झाली. त्यामुळे सुरक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

खडकवासला धरणाच्या चौपाटीसह पानशेत वरसगाव धरण परिसरही पर्यटकांनी गजबजून गेला होता. राजगड किल्ल्यावर दिवसभरात पंधरा हजारांवर पर्यटकांनी हजेरी लावली. मुंबई, ठाणे आदी ठिकाणांसह दिल्ली, गुजरात आदी राज्यांतील पर्यटकांनी गर्दी केली होती. गडावरील ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक वनसंपदेचा विलोभनीय दर्शन घेत युवक-युवती, मुलांसह ज्येष्ठांनीही सुटीचा आनंद साजरा केला. तटबंदी, बुरूज व प्रवेशद्वाराच्या धोकादायक ठिकाणी उभे राहून मोबाईलमध्ये काही पर्यटक फोटो काढत होते. उन्मत्त पर्यटकांना रोखण्यासाठी गडावरील पुरातत्त्व विभागाचे पहारेकरी बापू साबळे, सुरक्षा रक्षक विशाल पिलावरे, आकाश कचरे यांची धावपळ सुरू होती. तोरणा गडावरही पाच हजारांवर पर्यटकांनी गर्दी केली होती.

 

Back to top button