शाळेला किलबिलाटाची प्रतीक्षा; धानोरीतील इमारत दोन वर्षांपासून वापराविना | पुढारी

शाळेला किलबिलाटाची प्रतीक्षा; धानोरीतील इमारत दोन वर्षांपासून वापराविना

संतोष निंबाळकर

धानोरी : येथील मुंजाबावस्ती परिसरात महापालिकेने प्राथमिक शाळेसाठी बांधलेली ‘बी.जी. टी. ई-लर्निंग’ची इमारत उद्घाटन होऊन दोन वर्षे झाल्यानंतरही वापरात नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळे या इमारतीला विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाची प्रतीक्षा असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपींसह नशेबाज लोकांचा वावर वाढला असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत 21 नोव्हेंबर 2021 रोजी या इमारतीचे उद्घाटन झाले होते. धानोरीत इतरत्र महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या दोन शाळा आहेत.
मात्र, मुंजाबावस्ती येथे महापालिकेची शाळा नाही. यामुळे महापालिकेने या ठिकाणी शाळेसाठी ’बी. जी. टी. ई- लर्निंग’ची इमारत उभारली आहे. परिसरात महापालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या पालकही मुलांना खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतात. मात्र, शुल्क थकल्यानंतर अडचणी येतात. शाळा बदलायची म्हटले तरी थकलेले शुल्क भरल्याशिवाय खासगी शाळा मुलांना दाखला देत नाहीत.
त्यामुळे अनेक पालक शुल्क माफीसाठी माजी लोकप्रतिनीधिंकडेकडे चकरा मारत असतात. कोरोना महामारीनंतर असे प्रकार खूप वाढले आहेत. मुंजाबावस्ती येथे महापालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाल्यास हे चित्र बदलेले, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. रहिवासी अन्वर शेख  म्हणाले की, या इमारतीत मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाल्यास सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल. पालकांचे खाजगी शाळांवर खर्च होणारे हजारो रुपये वाचतील.
गोरगरिबांना खासगी शाळेचे शुल्क परवडत नाही. मुंजाबा वस्ती परिसरात कामगार व मध्यमवर्गीय लोकसंख्या जास्त आहे. धानोरीत मराठी माध्यमाच्या दोन शाळा आहेत. त्यामुळे येथे ‘सी. बी. एस. ई.’ ची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू होण्यासाठी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून दिला. मात्र, अनेकदा पत्रव्यवहार करूनही ही शाळा सुरू करण्याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही.
– अनिल टिंगरे, माजी नगरसेवक
बी.जी. टी. ई – लर्निंग स्कूलच्या इमारतीत इतर ठिकाणच्या मराठी माध्यमाच्या शाळेतील काही वर्ग लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी प्रशासकीय अधिकार्‍यांकडे पाठविण्यात
आला आहे.
  – शिल्पकला रंधवे, सहायक प्रशासकीय अधिकारी, महापालिका.
हेही वाचा

Back to top button