Pune Book Festival : पुस्तकातील परिच्छेद वाचण्याचा विश्वविक्रम

Pune Book Festival : पुस्तकातील परिच्छेद वाचण्याचा विश्वविक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात 11 हजार 43 नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद 30 सेकंदांत वाचण्याचा नवा विश्वविक्रम गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला आहे. यापूर्वी असा रेकॉर्ड चीनच्या नावावर होता. पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त वाचनसंस्कृती वाढण्यासाठी चौथा विश्वविक्रमाची नोंद गुरुवारी करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने हा विश्वविक्रम करण्यात आला. राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त विश्वविक्रम करण्यात येत आहेत.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे आदी उपस्थित होते. हा विश्वविक्रम 'लार्जेस्ट ऑनलाइन अल्बम ऑफ पीपल रीडिंग सेम पॅराग्राफ ऑफ मिनिमम ड्युरेशन ऑफ 30 सेकंड' या विषयावर नोंदविण्यात आला आहे.

पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना यानिमित्ता एकप्रकारे इंटर्नशिप मिळाली आहे. त्यांनी 14 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे व्हिडीओ रेकॉर्ड केले. या व्हिडीओंचा डेटा अनालिसिस, प्रोसेसिंग, इमेज प्रोसेसिंग, व्हिडीओ प्रोसेसिंग शिकता आले. त्यांना दोन क्रेडिट मिळणार आहे. या उपक्रमानिमित्त सामान्य नागरिक, प्राचार्य, आयटी कर्मचारी यांच्याशी चर्चा करता आली. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.

-डॉ. आदित्य अभ्यंकर, विभागप्रमुख, तंत्रज्ञान विभाग

पुस्तकांच्या वाचनामुळे माणूस घडतो. माणूस घडविण्याची ही प्रक्रिया यापुढेही पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त सुरू राहायला हवी. महोत्सवात लेखन आणि वाचक म्हणून आनंद झाला आहे. या महोत्सवाला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्तम आहे. दिल्ली, जयपूर, कोलकता येथील पुस्तक महोत्सवाच्या तोडीचा पुणे पुस्तक महोत्सव भरवला आहे.

-डॉ. अरुणा ढेरे, ज्येष्ठ कवयित्री

विद्यार्थ्यांकडून पुस्तक खरेदीस प्रतिसाद

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे देशातील वेगवेगळ्या शहरात वाचन संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पुणे येथे आयोजित पुस्तक महोत्सवालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट देऊन उत्सुकतेने पुस्तकांची खरेदी करीत आहेत, ही चांगली बाब असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय पुस्तक न्यासकडून आयोजित करण्यात आलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, येथे पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री झालेली असून 24 डिसेंबरपर्यंत आणखीन पुस्तकांची विक्रमी विक्री होईल. पाटील यांनी विविध प्रकाशनाच्या दालनांना भेट देऊन पुस्तकांची खरेदी केली.

पुस्तक महोत्सवातील कार्यक्रम ऐनवेळी रद्द

'पुणे पुस्तक महोत्सवा'त साधना प्रकाशनाच्या राजन हर्षे लिखित 'पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात' या पुस्तकावर गुरुवारी (दि. 21) होणार्‍या चर्चेचा कार्यक्रम रद्द करावा लागला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाकडून (एनबीटी) ऐनवेळी सांगण्यात आल्याने निर्णयाचा निषेध करून हा कार्यक्रम आता शुक्रवारी (दि. 22) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात सकाळी साडेदहा वाजता करण्याचे साधना प्रकाशनाकडून जाहीर करण्यात आले. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे म्हणाले कीे, 'साधना' प्रकाशनाने महोत्सवात कार्यक्रम करण्यासंदर्भात संयोजन समितीशी संवाद साधलेला नाही. ज्या वेळी ही माहिती कळाली तेव्हा कोणताही स्लॉट उपलब्ध नव्हता. या प्रकाशन संस्थेचा पुस्तकांचा एक स्टॉल प्रदर्शनात समाविष्ट आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news