IND vs NZ 2nd T20 : राहुल – रोहित जोडीची शतकी सलामी; मालिका भारताच्या खिशात | पुढारी

IND vs NZ 2nd T20 : राहुल - रोहित जोडीची शतकी सलामी; मालिका भारताच्या खिशात

रांची : पुढारी ऑनलाईन

IND vs NZ 2nd T20 : दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने न्यूझीलंडचे १५४ धावांचे आव्हान १७.२ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात पार करत मालिका २ – ० अशी खिशात घातली. भारताकडून सलामीवीर केएल राहुल ( ६५ )  आणि रोहित शर्मा ( ५५ ) यांनी दमादर अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी शतकी सलामी दिली. त्यानंतर पंतने सलग दोन षटकार मारत सामना १८ व्या षटकातच संपवला. न्यूझीलंडकडून कर्णधार टीम साऊदीने ३ विकेट घेत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

न्यूझीलंडने ठेवलेल्या १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केली. लोकेश राहुलने पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी करण्याची रणनीती अवलंबली तर रोहित बॉल टू रन खेळत होता. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ४५ धावा केल्या.

पॉवर प्ले नंतर राहुल बरोबरच रोहितनेही आपला गिअर बदलला. या दोघांनी १० व्या षटकात भारताला ७९ धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, राहुलने आपले अर्धशतक पूर्ण करुन घेतले. आक्रमक पवित्र्यात असलेल्या फटकेबाजी सुरु केली. या दोघांनी शतकी  सलामी देत भारताला १२ षटकात १०५ धावांपर्यंत पोहचवले.

दोन्ही सेट झालेले सलामीवीर न्यूझीलंडचे १५४ धावांचे आव्हान नाबाद पार करण्याच्या दिशेने पुढे सरकत होते. मात्र कर्णधार साऊदीने केएल राहुलला ६५ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेला रोहित शर्माने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत विजयाकडे कूच केली. दरम्यान, रोहितनेही आपले अर्धशतक पूर्ण केले.

मात्र साऊदीने रोहितला ५५ धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. पाठोपाठ सूर्यकुमार यादवचाही त्रिफळा उडवत भारताला लगेचच तिसरा धक्का दिला. सूर्यकुमार बाद झाला त्यावेळी भारताच्या १३७ धावा झाल्या होत्या. क्रिजवर आलेल्या ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यरने न्यूझीलंडला अणखी संधी न देता सामना १८ षटकात संपवला. पंतने पाठोपाठ दोन षटकार मारत सामना जिंकून दिला.

IND vs NZ 2nd T20 : धडाकेबाज न्यूझीलंडला भारताने आवळले

तत्पूर्वी, भारत आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यातही कर्णधार रोहित शर्माने नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि डॅरेल मिचेलने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. यात मार्टिन गप्टिल आघाडीवर होता. गप्टिल आणि मिचेलने ४ षटकातच संघाला चाळीशी पार करुन दिली होती.

मात्र पहिल्या सामन्याप्रमाणेच आजच्या सामन्यातही राहुल चाहरने मार्टिन गप्टिलला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. गप्टिल बाद झाल्यानंतर मिचेल आणि चॅपमॅनने न्यूझीलंडला पॉवर प्लेमध्ये ६० धावांपर्यंत मजल मारली. गप्टिल बाद झाल्यानंतर आलेल्या चॅपमॅनने धावगती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. आक्रमक फलंदाजी करत त्याने १७ चेंडूत २१ धावा केल्या. मात्र अक्षर पटेलला मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला.

चॅपमॅन बाद झाला त्यावेळी न्यूझीलंड ८० धावांपर्यंत पोहचला होता. दरम्यान, न्यूझीलंडची धावगती मंदावली. याचा फायदा उचलत हर्षल पटेलने सेट झालेल्या डॅरेल मिचेलला ३१ धावांवर बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. मिचेल बाद झाल्यानंतर फिलिप्स आणि साईफर्टने १३ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले.

फिलिप्स आणि साईफर्टने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी रचत संघाला १५ षटकात १२५ धावांपर्यंत पोहचवले. मात्र रविचंद्रन अश्विनने ही जोडी फोडली. त्याने टीम साईफर्टला १३ धावांवर बाद केले. यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडची धावगती मंद करण्यास सुरुवात केली.

हर्षल पटेलने सेट झालेल्या फिलिप्सला ३४ धावांवर बाद करत न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. पदार्पण करणाऱ्या पटेलने आपला दुसरा बळी टिपला. त्यानंतर भुवनेश्वरने आक्रमक शैलीच्या जेम्स निशेमला अवघ्या ३ धावांवर बाद केले. यामुळे न्यूझीलंडची धावगती फारच मंदावली. अखेर न्यूझीलंडले २० षटकात ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली.

IND vs NZ 2nd T20 : न्यूझीलंडच्या संघात तब्बल तीन बदल

भारताने आपल्या संघात एक बदल केला आहे. मोहम्मद सिराजच्या जागी हर्षल पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे. सिराज दुखापतग्रस्त आहे. तर न्यूझीलंडने आपल्या संघात तीन बदल केले असून पहिल्या सामन्यात विश्रांती घेणाऱ्या मिलने, निशेम आणि इश सोधी हे आजच्या सामन्यात खेळणार आहे.

भारताने पहिला टी २० सामना ५ विकेट्सनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून भारत मालिका खिशात घालण्याच्या इराद्यात असणार आहे. तर न्यूझीलंडला मालिका वाचवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे.

Back to top button